Phaltan: पाणी साठवण योजनेची प्रलंबित कामे पूर्ण करा; आमदार सचिन पाटील
Phaltan

Phaltan: फलटण तालुक्यातील १८ पाणी साठवण योजनांचा आढावा घेऊन आमदार सचिन पाटील यांनी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र शासनाने फलटण तालुका दुष्काळग्रस्त घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे. तालुक्यातील कोणत्याही गावाला पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहू दिले जाणार नाही, अशी ग्वाही आमदार सचिन पाटील यांनी दिली.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या फलटण उपविभागांतर्गत तालुक्यातील १८ पाणी साठवण योजनांच्या कामांची तसेच उपलब्ध पाणीसाठ्याची प्रत्यक्ष पाहणी करुन आढावा घेतला. दुष्काळी परिस्थितीत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे अशा गावांना या साठवण तलावांमधून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या नियोजनावर यावेळी विशेष भर देण्यात आला. या पाहणीदरम्यान विडणी, निंबळक, पिंप्रद, राजाळे, सोमंथळी, गिरवी, धुळदेव आणि वाठार निंबाळकर येथील पाणी साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले असल्याचे निदर्शनास आले. मात्र, सोनगाव आणि सरडे येथील साठवण तलावांना अद्याप विद्युतपुरवठा जोडण्यात आलेला नसल्याने ते पूर्णपणे रिकामे असल्याचे आढळले. तसेच शिंदेवाडी येथील साठवण तलावाच्या कामात विद्युत रोहित्र स्थलांतरित करण्याचे काम प्रलंबित असल्याचेही निदर्शनास आले.
या प्रलंबित कामांची दखल घेत आमदार सचिन पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सोनगाव, सरडे आणि शिंदेवाडी येथील कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. ही कामे वेळेत पूर्ण झाल्यास नीरा उजवा कालव्याचे पिण्याच्या पाण्याचे आवर्तन उपलब्ध झाल्यानंतर संबंधित साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, होळ- खामगाव, निंभोरे, सस्तेवाडी आणि ठाकूरकी- फरांदवाडी येथील पाणी साठवण तलावांची कामे प्रगतिपथावर आहेत. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करून योजना कार्यान्वित करण्याच्या सूचना आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. या पाहणी दौऱ्यावेळी संबंधित लाभक्षेत्रांतील नागरिक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार उपस्थित होते.
पाणीसाठा नियोजनाच्या सूचना
भविष्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यास या साठवण तलावांमधून टँकरद्वारे संबंधित गावांना पाणीपुरवठा करणे सुलभ होणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करावे, प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत आणि तालुक्यातील कोणत्याही गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश आमदार सचिन पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.





