घरगुती नळजोडणी मार्च 2024 पर्यंत पूर्ण करा; पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे आदेश

पुणे – घरगुती नळजोडणीची कामे मार्च 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील घरगुती नळजोडणीची प्रलंबित कामे मिशन मोडवर पूर्ण करुन दैनंदिन कामाचा अहवाल सादर करण्याचे आदेश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषदेला दिले.
पुणे विभागातील पाणीपुरवठा योजनांच्या कामाबाबतीत आढावा बैठक मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये हे आदेश देण्यात आले. मंत्री पाटील म्हणाले की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेकडील पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे मिशन मोडवर पूर्ण करावीत. ठेकेदारांच्या कामाबाबत तक्रारी येऊ नये. ज्या तीर्थक्षेत्राला पाणीपुरवठा योजनेची गरज आहे.
तेथील योजनेचा सुधारित आराखडा तत्काळ सादर करावा. घरगुती नळजोडणीची कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावी याकडे जिल्हा परिषदेच्या सीइओंनी विशेष लक्ष द्यावे. ज्या पाणीपुरवठा योजनांना पाणी मिळण्यासाठी अडचणी आहेत, त्या योजनांना कालवा सल्लागार समितीमार्फत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.





