पुणे – नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) गेल्या 24 तासांपासून स्थिर असून, येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून मध्य अरबी समुद्राचा आणखीन काही भाग व्यापण्याची अपेक्षा आहे. सोबतच अरबी समुद्राचा दक्षिणेकडील भाग, लक्षद्वीप व केरळचा उर्वरित भाग, कर्नाटकचा काही भाग, तामीळनाडू व बंगालच्या उपसागराचा नैऋत्येकडील काही भाग व्यापण्यासाठी मान्सूनला अनुकूल वातावरण असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यावर त्यानंतरच्या 24 तासांत ईशान्य बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग, वायव्य बंगालच्या उपसागराचा काही भाग, त्रिपुरा, मेघालय आणि आसामचा उर्वरीत भाग तर हिमालय पायथ्यासह बंगालच्या उपसागराचा बहुतांश भाग व्यापला. मात्र, दुसऱ्या दिवशी मान्सूनची वाटचाल स्थिर होती. दरम्यान, पुढील वाटचालीसाठी मान्सूनला अनुकूल वातावरण असल्याने, परिणामी महाराष्ट्र राज्यातील कोकण-गोवा तीन ते चार दिवस बहुतांश भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. मध्य महाराष्ट्रात 2 ते 5 जून, मराठवाड्यात 2 ते 3 आणि विदर्भात 5 जूनला मेघगर्जनेसह पाऊस पडेल. यावेळी वाऱ्याची गती ताशी 40 ते 50 इतकी असेल. त्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात उष्णतेची लाट कायम राज्यातील विदर्भामध्ये नागपूर, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची चिन्हे आहेत. तर, काही भागात पारा वाढलेला असेल. दि. 5 जूननंतर विदर्भातील बहुतांश भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात कोकण-गोव्यात सर्वदूर पावसाचा अंदाज असला, तरी दि. 2 जून रोजी काही भागातील हवामान उष्ण आणि दमट असेल, असा अंदाज आहे.