नवी दिल्ली –भाजपने कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात, तर कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. त्या परस्परविरोधी तक्रारींची दखल घेऊन निवडणूक आयोगाने कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याकडून उत्तर मागवले. खर्गे आणि नड्डा यांना निवडणूक आयोगाने स्वतंत्र पत्रं पाठवली. त्यांच्याकडून सोमवारी (१८ नोव्हेंबर) दुपारी १ वाजेपर्यंत उत्तरे मागवण्यात आली आहेत. तसेच, त्यांना लोकसभा निवडणुकीवेळी केलेल्या सूचनेचीही आठवण करून देण्यात आली आहे. प्रचारावेळी निवडणूक आचारसंहितेचे पालन करण्याच्या उद्देशातून स्टार प्रचारक आणि नेत्यांवर नियंत्रण ठेवले जावे, अशी सूचना आयोगाने याआधी खर्गे आणि नड्डा यांना केली होती. सध्या महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांत विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. त्या राज्यांत मोदी, शहा आणि राहुल हे आपापल्या पक्षांचा झंझावाती प्रचार करत आहेत. त्यावेळी त्यांनी केलेल्या काही वक्तव्यांवर प्रतिस्पर्धी पक्षांकडून आक्षेप घेण्यात आला. त्यावरून आता खर्गे आणि नड्डा यांना निवडणूक आयोगाला उत्तर द्यावे लागणार आहे.