वाईमध्ये अल्पवयीन मुलांविरोधात नियमांचे उल्लंघन केल्याच्या तक्रारी

वाई – भरधाव वेगात दुचाकी चालविणाऱ्या, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अल्पवयीन मुलांना वेळीच चाप बसावा यासाठी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान, यासंदर्भात वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांना निवेदनही देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अल्पवयीन मुले व मुली वाहन परवाना नसताना भरधाव वेगाने दुचाकी चालवत आहेत, ही अतिशय गंभीर बाब असून त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी, नियम धाब्यावर बसवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत कर्कश हॉर्न वाजवत गाडी चालवीत आहेत.
त्यामुळे नागरिकांना त्रास होत असून पर्यावरणावरही परिणाम होत आहे. त्यामुळे अशा प्रकारे गाडी चालवून वैयक्तिक व सामाजिक अपघातांना निमंत्रण दिले जात आहे असल्याने कायदेशीर नियमाचे कडक अंमलबजावणी करून प्रशासनाने अशा वाहनचालकांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे. निवेदनावर भाजप शहराध्यक्ष राकेश फुले, देवानंद शेलार, सचिन घाटगे, यशवंत लेले, प्रशांत नागपूरकर, तेजस जमदाडे, नरेंद्र महाजन, प्रसाद चरेगावकर, केशव सूर्यवंशी, राहुल जमदाडे यांच्या सह्या आहेत.





