सध्या रमजानचा महिना सुरु आहे. या रमजान महिन्याच्या निमित्ताने दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजयने ७ मार्चला चेन्नईत इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. यासाठी त्याने एक दिवसाचा रोजा ठेवला होता. यावेळी त्याने पांढरे कपडे, डोक्यावर टोपी या पेहरावात नमाज पठण देखील केले होते. या इफ्तार पार्टीमधील विजयचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. मात्र आता चेन्नईतील इफ्तार पार्टीवरून थलपती विजयविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. काय आहे नेमके प्रकरण? थलपती विजयवर मुस्लिमांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तामिळनाडूच्या सुन्नत जमातचे सय्यद कौस यांनी हा आरोप केला आहे. याच सुन्नत जमातने विजय विरोधात पोलीसात तक्रार दाखल केली असून चेन्नईत झालेल्या इफ्तार पार्टीत उपस्थित राहण्यावरून अभिनेत्यावर आक्षेप व्यक्त केला आहे.थलपती विजयने चेन्नईतील रोयापेट्टाच्या YMCA मैदानावर इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. त्याच्या राजकीय पक्षाकडून इथे सगळी व्यवस्था करण्यात आली होती. View this post on Instagram A post shared by Thalapathy vijay 🔵 (@actor_vijay_offli) या इफ्तारमध्ये चेन्नईच्या १५ मशिदींच्या इमामांना निमंत्रित करण्यात आलं होतं. तसंच ३००० लोकांना थांबण्याची व्यवस्था केली होती. तेव्हा विजयने या एका दिवसाचा रोजा केला होता आणि नमाज पठण केल्यानंतर तो सोडला होता. विजय हा ख्रिश्चिन असून त्याची आई हिंदू आहे. गेल्यावर्षी विजयने २ फेब्रुवारीला तळिलगा वेत्री कजगम ( तामिळनाडू विजय संघ ) द्वारे राजकारणात एन्ट्री केली. मोठ्या दिमाखात विजयची राजकारणात एन्ट्री झाली होती. थलपति विजयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो शेवटचा अॅक्शन, थ्रिलर चित्रपट ‘द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम’ चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात प्रशांत, प्रभु देवा, मोहन, जयराम, अजमल अमीर, वैभव, योगी बाबू, प्रेमगी अमरेन, स्नेहा, लैला आणि मीनाक्षी चौधरी यांच्या महत्वपूर्ण भूमिका होत्या. तसेच तो ‘जन नायकन’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात विजयसह पूजा हेगडे, बॉबी देओल, गौतम वासुदेव मेनन, प्रकाश राज यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.