मदुराई – ऑनलाइन जुगाराची जाहिरातबाजी केल्याप्रकरणी विराट कोहली, सौरव गांगुली यांच्यासह काही कलाकारांच्या विरोधात मद्रास न्यायालयात याचिका तसेच तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावर या सेलिब्रेटींकडून न्यायालयाने स्पष्टीकरण मागवले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली तसेच अभिनेते प्रकाश राज, अभिनेत्री तमन्ना भाटिया, अभिनेता राणा डग्गुबुट्टी यांना न्यायालयाने नोटीस बजावली आहे. ऑनलाइन गॅम्बलिंग ऍपची जाहिरात करून त्याला प्रोत्साहन दिल्याचा या सगळ्यांवर आरोप करण्यात आला आहे. या याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयात सुनावणी झाली.
या व्यक्तींनी ऑनलाइन ऍपच्या केलेल्या जाहिरातीमुळे जुगाराला प्रोत्साहन मिळत आहे. तसेच लोकांसमोर चुकीचा संदेश जात आहे. सेलिब्रीटींनी कोणत्याही गोष्टीची जाहिरात केली तर त्याचा अनेकांवर प्रभावही पडतो त्यामुळे या चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहनही मिळते, अशी याचिका दाखल करण्यात आली होती.
या सेलिब्रीटींसह उच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारलाही स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. येत्या 19 नोव्हेंबरला याबाबत सुनावणी होणार आहे. या सर्वांना अटक करण्याची मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.