रोहन मुजूमदार
पुणे – माळेगाव सहकारी साखर कारखान्यात विरोधी तावरे गटाचे वर्चस्व होते. सोमेश्वरमध्ये विरोधी म्हणून काकडे गटाचा दबदबा होता. त्यावेळी दोन्ही कारखान्याच्या ऊस दरांमध्ये नेहमीच चढाओढ होत होती. त्यामुळे सभासदांना दरवाढीचा फायदा होत होता. मात्र, आता सोमेश्वरसह माळेगाव कारखान्यावर राष्ट्रवादीची सत्ता आहे. यामध्ये सोमेश्वरच्या विरोधकांनाही राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये ओढून घेतल्याने विरोधकांची धार बोथट झाली आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षे तरी दोन्ही कारखान्यांमध्ये दराची चढाओढ रंगणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक मुदत संपलेली आहे. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक पुढे ढकलून विद्यमान संचालक मंडळास काम करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे प्रस्थापितांना निवडणुकीसाठी वेळ मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखान्याचे मुख्य विरोधक सतीश काकडे यांच्याशी “जुळवून’ घेतले असल्याने आगामी निवडणूक बिनविरोध पार पडण्याची शक्यता आहे. जर निवडणूक लागलीच तर विरोधकाचे तसे बळ कमकुवत ठरेल, असा अंदाज कार्यक्षेत्रातील सभसदांमधून व्यक्त होत आहे.
सोमेश्वरनरने 2018-19 मध्ये सर्वाधिक 3300 रुपये अंतिम दर जाहीर करून राज्यात उच्चांकी दर देणारा कारखाना ठरला होता. मात्र, त्यांचा उच्चांकी दर हा काही दिवसांपुरताच राहिला. माळेगाव कारखान्याने उच्चांकी 3400 रुपये जाहीर करून सोमेश्वर कारखान्याच्या उच्चांकी भावाची हवाच काढून टाकली होती. त्यामुळे 2019-20 मध्ये सोमेश्वर कारखाना ऊसदर काय जाहीर करणार, याकडे बारामतीसह जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र, गेल्यावर्षीपेक्षाही 200 रुपयांनी कमी दर जाहीर करीत सभासदांची नाराजी ओढवून घेतली आहे.
सर्वाधिक दर देणाऱ्या माळेगाव कारखान्याची परंपरा खंडित झाली आहे. सोमेश्वरपेक्षाही कमी म्हणजेच 2750 रुपये दर जाहीर करून उच्चांकी दराची चढाओढ यापुढे रंगणार नाही, ही चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.
- अध्यक्ष बदलणार?
ग्रामपंचायतीची प्रभाग रचना नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजणार आहे. त्यानंतरच सोमेश्वर कारखान्याचीही निवडणूक लागण्याची शक्यता आहे. मात्र, यंदा अध्यक्षपदासाठी चुरस नक्की रंगणार हे मात्र निश्चित आहे. कारण पवार-काकडे गटाचे मनोमिलन झाले आहे. जर काकडेंना पद दिले नाही तर ते धोक्याचे ठरू शकते. तर विद्यमान अध्यक्षांना थांबवून काकडेंना शांत करण्यासाठी अध्यक्षपद देण्याची खेळी उपमुख्यमंत्री पवार खेळणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- विद्यमान अध्यक्षांची जोरदार तयारी
शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे हे राष्ट्रवादीच्या गोटात आले आहेत. त्यांच्या मध्यस्थीने राष्ट्रवादी कॉंग्रेसने राजू शेट्टींना गळाला लावले आहे. त्यामुळे सध्या तरी काकडे हे पवारांच्या जवळचे असल्याने आपल्या अध्यक्षपदाला धक्का लागू शकतो, हे विद्यमान अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप जाणून आहेत. त्यांनी सध्या अप्रत्यक्षपणे शक्तीप्रदर्शन करून दबाव वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जगताप यांच्या कार्यकाळात कारखान्याची दमदार वाटचाल सुरू आहे. सोमेश्वरची निवडणूक झाल्यास जगताप यांच्या दमदार कामाची पोचपावती मतदार देतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.