पुणे – उद्योजकाच्या मृत्यूप्रकरणी १० कोटी ९५ लाख ९९ हजार ५७९ रुपये नुकसान भरपाईचा आदेश मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे अध्यक्ष व प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी दिला आहे. या रक्कमेवर दावा दाखल केलेल्या तारखेपासून म्हणजे १ मार्च २०१६ पासून वार्षिक ७.५ टक्के व्याज द्यावे लागणार आहे. व्याजासह ही रक्कम १९ कोटी २० हजार १४६ रुपये होत आहे. मोटार अपघात न्यायप्राधिकरणाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी नुकसान भरपाईची रक्कम आहे. या प्रकरणात अर्जदारांतर्फे ॲड.संजय राऊत, ॲड.अनिता राऊत, ॲड.अश्विनी वाडेकर यांनी काम पाहिले. तर कंपनीतर्फे सुनील द्रविड यांनी बाजू मांडली. राजीव विनोद शहा यांच्या मृत्यूप्रक्राणी वडील विनोद मंगलदास शहा, आई इंदिरा, पत्नी सोनल, मुली सिमरन आणि आयुशी, मुलगा श्रेय यांनी येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता. अपघातातील ट्रकचे मालक आणि इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता. राजीव हे ९ जानेवारी २०१२ रोजी होंडा सिटी कारमधून मुंबईकडून चाकण येथील फॅक्टरीकडे चालले होते. त्यावेळी दुसऱ्या लेनमधून पुणेकडून मुंबईकडे ट्रक जात होता. त्या ट्रकने समोर जाणाऱ्या होंडा सिटीला धडक दिली. त्यामुळे ती होंडा सिटी गाडी समोरील लेनमध्ये घुसली. तिने राजीव असलेल्या होंडा सिटीला धडक दिली. त्याच वेळी पाठीमागून आलेल्या एशियाड एस.टी.चीही राजीव यांच्या गाडीला धडक बसली. या विचित्र अपघातात राजीव यांचा मृत्यू झाला. यामध्ये नुकसान भरपाईसाठी येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला. अर्जदारांतर्फे मयताचे वडील विनोद, अपघातातील होंडा सिटीचा चालक यांची साक्ष घेण्यात आली. या दोघांचीही विमा कंपनीतर्फे उलट तपासणी घेण्यात आली. तर एशियाड एस.टी.च्या चालकाची विमा कंपनीतर्फे साक्ष घेण्यात आली. त्याची उलट तपासणी अर्जदारांच्या वकिलांनी घेतली. राजीव शहा यांचे १ एप्रिल २००७ ते १ एपिल २०१४ या कालवधीत भरलेले आयकर, दोन पासपोर्ट आणि इंजिनिअर डिग्री आणि पोलीस पेपर न्यायालयात दाखल केले होते. राजीव यांच्या उत्तराखंड येथील कंपनीच्या उत्पन्नाची माहिती देण्यात आली. अर्जदारांतर्फे उच्च व सर्वौच्च न्यायालयाच्या १६ न्याय निवाड्याचे दाखले देण्यात आले. त्यावरन न्यायालयाने हा निकाल दिला. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्य कुटुंबियांना न्याय मिळवून दिल्याचा आनंद वाटत आहे. मोटार अपघात न्यायप्राधिकरणाने दिलेली ही उच्चांकी भरपाई आहे. – ॲड.संजय राऊत व ॲड.अनिता राऊत (अर्जदारांचे वकील)