पुणे(प्रतिनिधी) – राज्यभरातील लाखो तरुणांचे भवितव्य अवलंबून असणारी सरळ सेवा भरती प्रक्रियेला गती मिळत आहे. या अंतर्गत होणारी कंपनी निवड अंतिम टप्प्यात असून, पुढील दोन दिवसात ही निवड होणार असल्याचे “महाआयटी’ (MahaIT) कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाचे (महाआयटी) व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोग यांनी कंपनी निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांना पत्र पाठविले आहे. त्यामुळे आता सरसेवा पदभरती साठीची कंपनी निवड प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
यासंदर्भात “मनविसे’चे शहराध्यक्ष कल्पेश यादव याबाबत गेले 8 महिने पाठपुरावा करीत आहेत. त्यांनी याबाबतचा लेखी खुलासा मागितला होता. हा खुलासा देताना महाआयटीने सध्याची स्पष्टता दर्शवली आहे. त्यामुळे लाखो तरुणांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, राज्यात होऊ घातलेली मेगा भरती ही “महापोर्टल’मध्ये झालेल्या भ्रष्टाचारानंतर थांबवण्यात आली होती. त्यामुळे लाखो तरुण चिंतेत होते. या भरतीसाठी नवीन कंपनी निवडीचे काम “महाआयटी’कडे देण्यात आली आहे.
ही कंपनी निवड जवळपास एक वर्षांपासून प्रलंबित आहे. यासाठीच “मनविसे’ने यापूर्वी त्यांनी महाआयटी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. आक्रमक पवित्रा घेतल्याने अखेर महाआयटीने त्यांना लेखी खुलासा देत पुढील दोन दिवसात अंतिम प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे सांगितले.