प्रतिबंधित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या वावरामुळे जिल्हा प्रशासनाची कारवाई
40 जण क्वारंटाईन
आंबेठाण – लॉकडाऊनमुळे थांबलेले अर्थचक्र सुरू करण्यासाठी काही अटी व शर्तींवर औद्योगिक वसाहत सुरू करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. मात्र चाकण एमआयडीसीतील काही कंपन्यांनी या अटी व शर्तींना हरताळ फसल्याचे महाळुंगे इंगळे (ता. खेड) येथील कंपनीत करोना संशित रुग्ण आढळल्याने समोर येत आहे. तर शासनाचे आदेश धाब्यावर बसवल्याप्रकरणी कंपनी मालकावर कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करून खबरदारीचे उपाय म्हणून कंपनी सील केली आहे.
महाळुंगे इंगळे येथे एका कंपनीत माळवाडी (पुणे) येथून एक कर्मचारी कामाला येत होता. मात्र, त्याच्या घरातील एक व्यक्ती करोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्याने महाळुंगे इंगळे परिसरातील नागरिकांच्या पायाखालची मातीच सरकली आहे. तो येथील ज्या कंपनीत कामाला होता त्या कंपनीतील 40 कामगारांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. दरम्यान, या करोना संशित कामगाराचा अहवाल अद्याप येणे बाकी असले तरी खबरदारीचे उपाय म्हणून प्रशासनाने तातडीने पावले उचली आहेत. तर प्रांताधिकारी, तहसीलदारांनी 14 गावांमधील कंपन्यांना भेट देत पाहणी केली. तसेच कंपन्यांमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाहणीसाठी पथके नेमली आहेत.
तहसीलदार सुचित्रा आमले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कंपनी सील करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. संशयित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या कामगारांना देखील होम क्वारंटाइन करण्याचे आदेश दिले आहेत. या कंपनीचे पदाधिकारी हे कंटेनमेंट झोनमधून ये-जा करत आहेत ही बाब तहसीलदार यांच्यासमोर आल्याने त्यांच्यावर तात्काळ 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे परिसरामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
नागरिकांच्या जीवनाशी खेळ
गेल्या दीड-दोन महिन्यांपासून महाळुंगे औद्योगिक परिसरातील कंपन्या सुरू नसल्या कारणाने या भागात काटेकोरपणे लॉकडाऊनचे पालन केले जात होते; परंतु मागील चार ते पाच दिवसांपासून कंपनीत सुरू झाल्याने कामगारांची ये-जा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रेड झोन व कंटेनमेंट झोन येथून देखील मोठ्या प्रमाणात कामगार येत आहेत. सुरक्षिततेचे सर्व नियम पायदळी तुडवून कुठल्याही नियम व अटींचे पालन न करता कारखाने सुरू करण्याची घाई कंपनी प्रशासनाने केली आहे. व उत्पादन सुरू करण्याच्या उतावळेपणामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याबाबत नागरिकांत चर्चा सुरू आहे.