व्यवस्था पुढे कायम राहण्याची शक्यता
सेवा क्षेत्रातील कंपन्यांकडून जास्त उपयोग होणार
पुणे – करोनाचा उद्रेक झाल्यानंतर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बरेच काम “वर्क फ्रॉम होम’ या पद्धतीने चालू आहे. आगामी काळात ही सेवा क्षेत्रातील बरिच कामे “वर्क फ्रॉम होम’च्या माध्यमातून केली जाण्याची शक्यता आहे.
वर्क फ्रॉम होम रुळविण्यासाठी सुरुवातीला कंपन्याना बरीच धावपळ करावी लागली, असे डब्ल्युएनएस या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी केशव मुरुगेश यांनी सांगितले. ते म्हणाले की, दिलेल्या ऑर्डर पूर्ण करण्यासाठी आम्ही 25 हजार कॉम्प्यूटर कर्मचाऱ्यांच्या घरी हलविले. सुरुवातीला एक आठवडा कंपन्या आणि कर्मचाऱ्यांचा ताळमेळ बसायला त्रास झाला. मग मात्र नंतर काम व्यवस्थित सुरू झाले. कार्यक्षमता वाढली. त्याचबरोबर वाहतुकीचा खर्च कमी झाला. याबाबी आमच्या निदर्शनास आल्या आहेत.
त्यामुळे आगामी काळात आम्ही जे काम घरातून करणे शक्य आहे, असे काम कर्मचाऱ्यांना घरी देण्याच्या शक्यतेवर विचार करीत आहोत. करोनामुळे ही नवी शक्यता खुली झाली आहे. याचा वापर भविष्यातही अनेक कंपन्या करण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. “वर्क फॉर्म होम’ फक्त माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी केलेले नाही तर इतरही कंपन्यांनी हा मार्ग अवलंबिला आहे.
त्यामध्ये बॅंका आणि सेवा क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे. माहिती तंत्रज्ञान आणि इतर उपकरणाच्या सहाय्याने कार्यालयातील बरीच कामे ऑफिसमधून केली जाऊ शकतात याचा साक्षात्कार कंपन्यांना आणि कर्मचाऱ्यांना झाला आहे. शहरातील बऱ्याच कर्मचाऱ्यांना प्रवास करून कामाच्या जागेवर यावे लागते. त्यामुळे श्रम आणि पैसा वाया जातो. “वर्क फ्रॉम होम’मुळे बरीच बचत झाली आहे. या संकल्पनेचा सर्वाधिक फायदा महिलांना होणार आहे. कौटुंबिक कारणामुळे त्यांना घरासाठी जास्त वेळ द्यावा लागतो. अशा पात्र महिला आपला काही वेळ कार्यालयीन कामासाठी देऊ शकतील.
2025 पर्यंत एकूण कर्मचाऱ्यांपैकी फक्त 25 टक्के कर्मचारी हे कार्यालयात येऊन काम करतील.
– एन गणपती सुब्रमण्यम, मुख्य कार्यपालन अधिकारी, टीसीएस कंपनी