Satara | कराडला क्रीडानगरी बनवण्यासाठी कटिबद्ध

कराड, (प्रतिनिधी) – येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर आयपीएलसारखे सामने व्हावेत. क्रिकेटसह सर्व मैदानी खेळांच्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न आहे. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांनी कराडचे नाव सातासमुद्रापार नेले. कराडचा नावलौकिक जगभरात व्हावा, यासाठी शहराला क्रीडानगरी बनवण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी दिली.
सौ. वेणुताई चव्हाण स्मृती सभागृहात स्टेडियमच्या प्रस्तावित विकास आराखड्याचे सादरीकरण व चर्चासत्रात ते बोलत होते. डॉ. अतुल भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी राज्य शासनाने 96.50 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या कामांचा प्रस्तावित आराखडा ‘बेरी बिल्टस्पेस’चे व्यवस्थापकीय संचालक नितीश बेरी यांनी नागरिकांसमोर सादर केला. आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट पिच व मैदान, रात्रीच्या सामन्यांसाठी दिव्यांची सोय, मैदानावर एकाच वेळी 25 हजार प्रेक्षक बसू शकतील, अशी आसन व्यवस्था केली जाणार आहे.
टेबल टेनिसची दोन आणि बॅडमिंटनची चार कोर्टस्, कुस्ती आखाडा, खेळाडू व प्रशिक्षकांसाठी खोल्या, वॉर्म-अप रुम, व्हॉलीबॉल व बास्केटबॉल कोर्ट, छोटी जिम, प्रशिक्षणासाठी हॉल, अशी व्यवस्था केली जाणार असल्याचे बेरी यांनी सांगितले.
या आराखड्यावर क्रिकेटप्रेमी, अॅथलेटिक्स, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, कबड्डी, फुटबॉल, अन्य क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षक व खेळाडूंनी सूचना मांडल्या. पावसाळ्यात मैदान जलदगतीने सुकून, सामने सुरू रहावेत, यासाठी उपाययोजना केली जाणार आहे. अॅथलेटिक्ससाठी स्वतंत्र सिंथेटिक ट्रॅक तयार केला जाणार आहे.
डॉ. भोसले म्हणाले, कराडला आयपीएलसह आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा व्हाव्यात, अशी आपली अपेक्षा आहे. फुटबॉल व अन्य काही खेळांसाठी स्वतंत्र स्टेडियम उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील राहू. नागरिकांच्या मतांचा विचार करून, वाढीव निधीची गरज असल्यास त्यासाठी पाठपुरावा करू.
माजी नगराध्यक्ष सौ. रोहिणी शिंदे, माजी नगरसेवक सौरभ पाटील, ऑलिम्पिक स्पोर्टस् असोशिएशनचे अध्यक्ष दिलीप चिंचकर, शारीरिक शिक्षक महासंघाचे कोल्हापूर विभागीय उपाध्यक्ष डॉ. महेंद्र भोसले, क्रिकेटपटू डॉ. उमेश साळुंखे, कराड क्रिकेट मित्र परिवाराचे मंजित अत्तार, बॅडमिंटन प्रशिक्षक नीलेश फणसळकर, स्केटिंग प्रशिक्षक योगेश लोंढे, तायक्वांदो प्रशिक्षक अमोल पालेकर, फुटबॉल प्रशिक्षक दीपक खटावकर, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे चंद्रकांत माने, धनुर्विद्या संघटनेचे तेजस लादे, रायफल शूटिंग खेळाडू सारंग थोरात, स्वाती पिसाळ, राष्ट्रीय खेळाडू डॉ. अमित माने, मनसेचे शहराध्यक्ष सागर बर्गे, राष्ट्रीय कबड्डीपटू सचिन पाटील, अॅड. संभाजीराव मोहिते उपस्थित होते.
स्टेडियमच्या उभारणीत योगदान देणार्या कुटुंबांचा गौरव
स्टेडियमसाठी जागा देणार्या पी. डी. पाटील, ज्ञानदेवराव जाधव, मारुतीराव दिवटे, विष्णू कांबळे, संपतराव पवार यांच्या कुटुंबीयांचा डॉ. भोसले यांनी गौरव केला.
स्टेडियमसाठी चार दशकांपूर्वी जागा दिल्याबद्दल जयवंतराव जाधव यांचे पुत्र आशुतोष व संपतराव पवार यांचे पुतणे अवी पवार यांचाही सत्कार केला. स्टेडियमच्या पुनर्विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विविध मंडळे, नागरिकांनी डॉ. भोसले यांचा सत्कार केला.





