भोर : भोर तालुका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गटावर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचे अजितदादांचे स्वप्न होते. दुर्दैवाने आज दादा आपल्यात नाहीत. त्यासाठी भोरमधील राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना संधी देऊन दादांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन भोर विधानसभेचे आमदार शंकर मांडेकर यांनी केले. भोलावडे-शिंद जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नांदगाव (ता. भोर) येथे आयोजित सभेत ते बोलत होते. पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, भोरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन ही निवडणूक लढवत आहेत. कार्यकर्त्यांनी स्वतःला उमेदवार समजून घरोघरी पोहोचावे. गेल्या पाच वर्षांत झालेली विकासकामे आणि भविष्यातील कांमाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी. राष्ट्रवादीचे भोर तालुकाध्यक्ष संतोष घोरपडेंनी सांगितले की, राष्ट्रवादीचे उमेदवार प्रवीण जगदाळे, मनीषा कंक व राजेश बोडके यांचा विजय म्हणजे अजित दादांना श्रद्धांजली वाहिल्यासारखे असेल. जिल्हा परिषद उमेदवार प्रवीण जगदाळे म्हणाले की, मला केवळ आश्वासने द्यायला आवडत नाही, तर प्रत्यक्ष काम करायला आवडते. भोलावडे गावचा सरपंच म्हणून तीन वर्षांपूर्वी जनतेने मला संधी दिली. त्या काळात दिलेल्या आश्वासनांपैकी ८० टक्के कामे मी पूर्ण केली आहेत. तीच कामे या गटात करायची आहेत. यावेळी रामचंद्र आवारे, बी. डी. गायकवाड, विठ्ठल शिंदे, केदार देशपांडे, यशवंत डाळ, रवींद्र बांदल, संतोष घोरपडे, अरुण मालुसरे, अविनाश गायकवाड, देवा मसूरकर, संतोष कंक, नितीन थोपटे, रघुनाथ पारठे, रामदास भोंडवे, सुनील भेलके, कविता खोपडे, सुरेखा मळेकर, संदीप खाटपे, बाळासाहेब पारठे, नथू कंक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. या निवडणुकीत भोलावडे-शिंद जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रवीण जगदाळे, शिंद व भोलावडे पंचायत समिती गणासाठी मनीषा कंक आणि राजेश बोडके हे नवीन आणि शुद्ध चारित्र्याचे चेहरे रिंगणात आहेत. हे सर्व उमेदवार कामाचे असून, त्यांच्या माध्यमातून भोरच्या विकासाला नवी गती मिळेल. जनतेचे प्रश्न सोडवणे आणि विकासकामे करणे हेच आपले उद्दिष्ट आहे. शंकर मांडेकर, आमदार, भोर विधानसभा एकाच दिवशी चार ठिकाणी प्रचार सभा मंगळवारी (दि. ३) उत्रौली-कारी गटात २ तर भोलावडे-शिंद गणात २ अशा ४ प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले होते. यात उत्रौली गणातील पाले सिद्धेश्वर मंदीर व कारी गणातील करंजे तर शिंद गणात नांदगाव व भोलावडे गणात म्हाळवडी येथे प्रचारसभा घेण्यात आल्या.