पिंपरी | अल्पवयीन असतानाच खुनासह केले २८ गुन्हे

पिंपरी, (प्रतिनिधी) – अल्पवयीन असतानाच खुनासह २८ गुन्हे करणारा आणि जून २०२४ मध्ये सज्ञान झाल्यानंतर आणखी १४ गुन्हे करणाऱ्या सराईताला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. ठिकठिकाणी केलेल्या घरफोडीच्या पैशांमधून मध्य प्रदेशात जाऊन चार पिस्तुल खरेदी केल्या.
दोन अल्पवयीन मुले व एकस साथीदारासह या सराईत गुन्हेगाराला दरोडा विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्यकडून 10 लाख 75 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने, आठ दुचाकी, चार पिस्तुल, चार जिवंत काडतुसे जप्त केली.
सुशील उर्फ बारक्या भरत गोरे (वय 18, रा. ओटास्कीम, निगडी) आणि अक्षय प्रभाकर कणसे (वय 22) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून जाताना पिस्तुल हवेत फिरवत रील्स बनवून ते इन्स्टाग्रामवर अपलोड केले. याप्रकरणी दरोडा विरोधी पथकाने दोघांना ताब्यात घेतले. याच आरोपीने पिस्तुलाचा धाक दाखवून कपड्याच्या दुकानातून जबरदस्तीने कपडे चोरून नेले.
त्यानंतर काही ठिकाणी घरफोड्याही केल्या. दरोडा विरोधी पथकाने सापळा लाऊन सुशील गोरे आणि अक्षय कणसे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे आणि चार रिकाम्या पुंगळ्या पोलिसांनी जप्त केल्या.
त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून देखील दोन पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे, तसेच 10 लाख 75 हजार रुपये किमतीचे 18 तोळे वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने, चार लाख 85 हजार रुपये किमतीच्या आठ दुचाकी असा एकूण 17 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईमुळे 14 गुन्हे उघडकीस आले आहेत. सुशील गोरे याच्या विरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, वाहन चोरी, जबरी चोरी, घरफोडी, वाहनांची तोडफोड असे एकूण 28 गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त विशाल हिरे, बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, उपनिरीक्षक भरत गोसावी,
पोलीस अंमलदार विक्रांत गायकवाड, गणेश हिंगे, महेश खांडे, गणेश सावंत, आशिष बनकर, विनोद वीर, उमेश पुलगम, गणेश कोकणे, राहुल खारगे, नितीन लोखंडे, प्रवीण कांबळे, प्रवीण माने, अमर कदम, समीर रासकर, चिंतामण सुपे, औदुंबर रौंगे, तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस हवालदार नागेश माळी, पोपट हुलगे यांनी केली.





