प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेचा आढावा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शुक्रवारी घेतला. या वेळी आयुक्तांनी निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार प्रभाग रचना झाली किंवा नाही, यासाठी काही प्रभागांच्या हद्दीची तपासणी केली, तसेच काही सूचनाही केल्या आहेत.त्यानुसार पुढील दोन दिवसांत प्रभाग रचना अंतिम करून सोमवारी किंवा मंगळवारी नगरविकास विभागास सादर केली जाणार आहे. राज्य शासनाने महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार प्रभागांचा आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ही सर्व प्रक्रिया गोपनीय असून, येत्या दि. ५ ऑगस्टपर्यंत प्रारूप प्रभागांचा आराखडा राज्य शासनाकडे सादर करण्याची अंतिम मुदत आहे.आगामी महापालिका निवडणुका चार सदस्यांच्या प्रभागाने होणार असल्याने महापालिका आयुक्तांनी प्रशासनाने २०१७ आणि सध्या केलेल्या दोन्ही आराखड्यांची पहाणी केली. नवीन आराखड्यात गावांचा समावेश झाला असल्याने त्यात काही बदल असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. नियमावलीनुसार प्रभाग रचना नैसर्गिक हद्दी, तसेच इतर नियमांचे पालन झाले आहे की नाही, याची चाचपणी करण्यासाठी काही प्रभागांच्या रचनांच्या हद्दीही आयुक्तांनी तपासून पाहिल्या आहेत. त्यामुळे आता प्रशासनाची प्रारूप प्रभाग रचना जवळपास तयार झाली असून, ती अंतिम करण्याचा शेवटचा टप्पाही झाल्याचे सांगण्यात येत आहे. अतिरिक्त ओमप्रकाश दिवटे, निवडणूक विभागप्रमुख उपायुक्त प्रसाद काटकर या वेळी उपस्थित होते.