– प्रा. डॉ. सुभाष राठोड आजकाल विद्यार्थी शाळेत, महाविद्यालयात केवळ औपचारिकता म्हणून प्रवेश घेतात आणि शिक्षणासाठी मात्र खासगी शिकवणुकीला जातात. पालकांचीही हीच धारणा झालेली आहे. त्यामुळे शिक्षणावर गडद काळे ढग निर्माण होत आहेत. आज शिक्षण हा एक व्यवसाय बनला आहे आणि त्याचा सर्वात ठळक चेहरा म्हणजे खासगी शिकवण्यांचा वाढता बाजार. एकेकाळी शिक्षण हे समाजसेवेचे, ज्ञानदानाचे व्रत मानले जात असे; परंतु आज या क्षेत्रात आर्थिक व्यवहारांचा आणि स्पर्धेचा प्रभाव अधिक दिसू लागला आहे. पालकांच्या महत्त्वाकांक्षा, विद्यार्थ्यांवरील स्पर्धेचा ताण आणि शालेय शिक्षणावरील घटता विश्वास या सर्व गोष्टींनी मिळून खासगी शिकवण्यांचे जाळे झपाट्याने पसरले आहे. या शिकवण्या आता केवळ पूरक शिक्षणाचे साधन राहिलेल्या नाहीत, तर त्या स्वतंत्र उद्योगसाखळी बनल्या आहेत. पूर्वी विद्यार्थी शाळेतील शिक्षकांनी दिलेले धडे आत्मसात करूनच उत्तम गुण मिळवत असत. मात्र आज शाळेत जाऊनही विद्यार्थी खासगी क्लासशिवाय अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिक्षकांच्या मनावर परीक्षा निकालांचा दबाव आहे, तर पालकांच्या मनात स्पर्धात्मक परीक्षांचे भय. परिणामी शाळा ही फक्त उपस्थिती नोंदविण्याचे केंद्र राहिली असून, खर्या अर्थाने शिक्षणाचा पाया ‘क्लासेस’मध्ये घडू लागला आहे! खासगी शिकवण्यांचा हा उद्योग इतका फोफावला आहे की त्याला आता ‘एज्युकेशन इंडस्ट्री’ असेच म्हणावे लागेल. अनेक ठिकाणी मोठमोठ्या कोचिंग संस्थांनी भव्य इमारती उभारल्या आहेत. तेथील शुल्क हे गरीब पालकांच्या आवाक्याबाहेर आहे. शहरातील प्रत्येक गल्लीबोळात ‘टॉपर क्लासेस’, ‘रेस इन्स्टिट्यूट’, ‘अमुक अमुक अकॅडमी’ अशी नावं आपल्याला दिसतात. त्यांचा उद्देश विद्यार्थ्याला घडवणे कमी आणि मार्केटमध्ये आपली ओळख निर्माण करणे अधिक आहे. शिक्षण क्षेत्रातील स्पर्धेने शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही थकवून टाकले आहे. या शिकवण्या विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या नावाखाली एका धावपळीच्या चक्रात ओढतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत शाळा, त्यानंतर कोचिंग क्लासेस आणि मग गृहपाठ अशी विद्यार्थ्यांची दिनचर्या बनली आहे. खेळ, वाचन, चिंतन, सर्जनशीलता या सगळ्याचा बळी या शैक्षणिक शर्यतीत जात आहे. पालकांची मानसिकता अशी झाली आहे की, क्लासेसला घातलं म्हणजे जबाबदारी संपली. त्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाऐवजी फक्त गुणांवर लक्ष केंद्रित झाले आहे. या परिस्थितीत शाळेतील शिक्षकांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. काही वेळा शिक्षक स्वतः क्लासेस घेत असल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास द्विधा झाला आहे. शाळेत शिकवताना शिक्षकांना विद्यार्थ्यांचे लक्ष मिळत नाही, कारण तेच विद्यार्थी त्यांच्याकडूनच सायंकाळी क्लासेसमध्ये अधिक पैसे देऊन शिकतात. परिणामी शालेय शिक्षणाची गुणवत्ता आणि शिक्षकांविषयी आदर या दोन्ही गोष्टी ढासळत चालल्या आहेत. शिक्षणसंस्थांनीही अनेकदा या प्रवाहास आळा घालण्याऐवजी त्यास अप्रत्यक्ष मान्यता दिली आहे. खासगी शिकवण्या या आज शिक्षणाचा पर्याय नाहीत, तर शिक्षणावरचं संकट बनल्या आहेत. समाजातील आर्थिक विषमता वाढवत आहेत. श्रीमंत पालकांना दर्जेदार कोचिंग मिळते, तर गरीब पालकांचा मुलगा त्या स्पर्धेत मागे राहतो. त्यामुळे शिक्षणातील समता, समान संधी आणि सार्वजनिक शिक्षणव्यवस्थेचा पाया हादरतो आहे. हळूहळू ही परिस्थिती समाजात शैक्षणिक अन्याय निर्माण करत आहे. या विकृतीवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने काही ठोस उपाययोजना तातडीने राबविणे गरजेचे आहे. सर्वप्रथम, शालेय शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षक प्रशिक्षण, शैक्षणिक साधने आणि मूल्यमापन पद्धतीमध्ये क्रांतिकारी बदल घडवणे आवश्यक आहे. शाळांमध्ये प्रत्यक्ष अध्यापनाचे आकर्षक आणि प्रयोगशील वातावरण निर्माण केले पाहिजे, ज्यामुळे विद्यार्थी शाळेतच आनंदाने शिकतील व बाह्य शिकवणीची गरज भासणार नाही. शासनाने खासगी शिकवण्यांचे नियमन करण्यासाठी एक स्वतंत्र कायदा व नियंत्रण संस्था निर्माण करावी, ज्यामार्फत अशा संस्थांच्या शुल्क, वेळापत्रक आणि गुणवत्तेवर देखरेख ठेवली जाईल. प्रत्येक विद्यार्थी वर्गाच्या बाहेर शिकवणी घेण्यास भाग पाडला जाणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे. शैक्षणिक व्यवस्थेत पारदर्शकता आणून, शाळा-क्लासेस यांच्यातील संबंध तोडले पाहिजेत. शिक्षकांना क्लासेसच्या आश्रयापासून मुक्त केले पाहिजे. शिक्षकांना ‘अध्यापनाची आवड’ हीच त्यांची खरी संपत्ती वाटली पाहिजे, ‘अतिरिक्त कमाईचा मार्ग’ नव्हे. पालकांनीसुद्धा आपली मानसिकता बदलली पाहिजे. मुलावर केवळ गुणांच्या अपेक्षेचा ताण देण्याऐवजी त्याच्या व्यक्तिमत्त्व विकासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अभ्यास म्हणजे स्पर्धा नाही, तर आत्मविकासाचा प्रवास आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. एकंदर पाहता, खासगी शिकवण्याचा वाढता बाजार ही केवळ शिक्षणातील समस्या नसून, ती संपूर्ण समाजाच्या मूल्यसंस्थेचे प्रतिबिंब आहे. शिक्षण हे व्याप नसून संस्कार घडविण्याचे माध्यम आहे, हे आपण विसरलो आहोत. आज पुन्हा एकदा शिक्षण क्षेत्रात मूल्य, संस्कार आणि सार्वजनिक जबाबदारी या तिन्ही गोष्टींचे पुनरुज्जीवन करणे ही काळाची गरज आहे. ज्याप्रमाणे ‘ज्ञान विकता’ येत नाही, तसेच ‘शिक्षण खरेदी’ करता येत नाही. ज्ञानाचा खरा प्रकाश फक्त त्या शिक्षकाकडून पसरतो, जो विद्यार्थ्याला शिकवण्यात नव्हे तर घडवण्यात आनंद मानतो. म्हणूनच आजच्या परिस्थितीत सर्वांनी मिळून विचार करणे आवश्यक आहे, आपण शिक्षण देत आहोत की फक्त गुणांची विक्री करीत आहोत?