शिरूर – शिरूर पोलिसांनी घरफोडी, जबरी चोरी आणि चोरी अशा क्लिष्ट गुन्ह्यांमागील सराईत आरोपींचा पाठपुरावा करत अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून तब्बल १२ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल शोधून काढत १८ गुन्ह्यांचे फिर्यादींना परत केला. पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुद्देमालामध्ये साडे सोळा तोळे सोन्याचे दागिने आणि दीड लाख रुपये रोख रक्कम यांचा समावेश असून, गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाची मोठ्या प्रमाणात मदत घेतली. शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अलीकडच्या काळात घरफोडी व चोरीचे अनेक गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यांचा तपास करताना तपास पथकाने विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, लोकेशन ट्रॅकिंग यांचा सखोल अभ्यास केला. त्यातून अज्ञात व सराईत गुन्हेगारांचा माग काढण्यात तपास पथकाला यश आले. त्यानंतर विविध पथकांनी छापेमारी करत मोठ्या प्रमाणात चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केला. २७ नोव्हेंबर २०२५ ते ४ डिसेंबर २०२५ या कालावधीत जप्त केलेला सर्व मुद्देमाल शिरूर पोलीस स्टेशन येथे आयोजित कार्यक्रमात संबंधित १८ गुन्ह्यांच्या फिर्यादींना परत करण्यात आला. चोरी गेलेला माल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक संदीप गिल,अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, तसेचपोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रत्यक्ष कारवाई पोलीस हवालदार बापू मांगडे, महिला पोलीस अंमलदार अर्चना यादव यांच्यासह तपास पथकाने केली. त्यांच्या मेहनतीतूनच मोठ्या प्रमाणात मुद्देमाल परत मिळवणे शक्य झाले. गुन्ह्यांतील मुद्देमाल परत मिळणे हे कोणत्याही फिर्यादीसाठी अत्यंत दिलासादायक असते. या प्रकरणात शिरूर पोलिसांनी दाखवलेली तत्परता, तपशिलवार तपास आणि तांत्रिक प्रगतीचा प्रभावी उपयोग यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिरूर पोलिसांच्या या धडाडीच्या कामगिरीमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात एक महत्त्वाची भर पडली असून, गुन्हेगारांनाही याचा स्पष्ट संदेश मिळाला आहे की कायद्याच्या हातापासून सुटका अशक्य आहे.