पुणे -एकीकडे नव्या करोना बाधितांची संख्या कमी होत असताना, बुधवारी करोनाने एकही मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आली. दरम्यान, गेल्या 24 तासांत 112 नवे बाधित आढळले आहेत. तर, आणखी 118 जण करोनामुक्त झाले आहेत. या आधी दोनवेळा शून्य बाधित मृतांची नोंद केली आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात पुण्यात राज्यातीलच करोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर खळबळ उडाली. 30 मार्च 2020 रोजी करोनाचा पहिला बळी पुण्यात नोंदवला गेला. एका महिलेचा करोनाने मृत्यू झाला. त्यानंतर 19 एप्रिलला मात्र एकही बाधित मृत झाल्याची नोंद झाली नाही.
त्यानंतर दि. 3 फेब्रुवारीला एकाच बाधिताचा मृत्यू झाला तर सहा फेब्रुवारीला एकाही मृताची नोंद झाली नाही. त्यानंतर 11 फेब्रुवारी रोजी एकच बाधित मृत पावला. दरम्यान, सक्रीय बाधितांची संख्याही सलग दुसऱ्या दिवशी हजाराच्या आतच म्हणजे 988 राहिली आहे.
सध्याच्या सक्रीय बाधितांमध्ये 151 जणांची प्रकृती गंभीर असून, 178 जण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात 5 हजार 986 संशयितांची स्वॅबटेस्ट झाली आहे.