शेवगाव – शेवगाव- पाथर्डी मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादीमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली. त्यात भाजपच्या मोनिकाताई राजळे यांनी बाजी मारली. मतदारांनी मोठा गवगवा झालेल्या जातीच्या फॅक्टरला थारा दिला नाही. तसेच मोठ्या प्रमाणात झालेल्या अर्थपूर्ण तडजोडीलाही झुगारले. जे आपल्या सुखदुःखाच्या वेळी धावून आले, सातत्याने संपर्कात राहिले त्यांची मतदारांनी जाण ठेवली. त्यांनी केलेल्या विकासकामावर शिक्कामोर्तब केले.
खरे तर महागाई वाढली, शेतमालाचे भाव पडले, बेरोजगारी शिगेला पोहचली अशा कारणाने भाजपा विरोधात सुप्त लाट होती. त्या लाटेत भल्याभल्यांनी गोते खाल्ले. त्यातून राजळेंची नौका तरली आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढला. या मतदारसंघातही बोधेगाव येथे सभा घेऊन त्यांनी हजारोंना चेतविले. खासदार अमोल कोल्हे यांनी पाथर्डीला रेकॉर्डब्रेक सभा घेवून भाजपाविरोधी रान उठवले. माजी आमदार नरेंद्र पाटील घुले, चंद्रशेखर घुले या बंधूनी गनिमी कावा करत दोन पावले मागे सरकून ते ऍड. प्रताप ढाकणे यांचे पाठीमागे उभे राहिले. घेतलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. तरीही त्यांना यश आले नाही.
राष्ट्रवादीचे उमेदवार ढाकणे यांचा कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढविण्याचा निश्चय होता. पक्ष वा चिन्ह कोणतेही असो त्यांनी उभे राहण्याचा चंग बांधला होता. त्यांच्या मागे माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचा भक्कम वारसा असतांना आणि दोन वेळेस विधानसभा पराभवाचा अनुभव असतांनाही विजयाचे नियोजन व प्रचाराचे गणित ढाकणे यांना साधता आले नाही. पत्नी प्रभावती ढाकणे जिल्हा परिषद सदस्या झाल्या तरी त्यांनी मतदारसंघात म्हणावा तसा जनसंपर्क वाढविला नाही.
भाजपाच्या विरोधातील आंदोलनात ते सातत्याने उतरले नाहीत. केदारेश्वरसारखा कारखाना हाती असतांना उसाला भाव देवून त्यांना शेतकऱ्यांना न्याय देता आला नाही. तसेच कारखान्यामार्फत शेतकरी हिताचे काही उपक्रम राबवून संपर्क वाढविला नसल्याच्या मतदारांच्या तक्रारी आहेत. मात्र राष्ट्रवादीने साथ दिल्याने ही निवडणूक चुरशीची झाली. या भागातील एका सूर्याचा ऐन दुपारी अस्त झाला. आमदार राजीव राजळे यांची ऐन उमेदीच्या काळात आणि आमदार मोनिकाताईना आधाराची आवश्यकता होती, अशा काळात एक्झिट झाली. त्याची सहानुभूती त्यांना निश्चितपणे मिळाली म्हणून त्या कर्तव्यात कमी पडल्या नाहीत. तरीही अनेकांच्या महत्त्वाकांक्षा जाग्या झाल्या.
अशा नाराजांना रसद पुरवणाऱ्यांनी त्यांची मोट बांधली. त्याला पक्षातील स्वकीयांनीही खतपाणी घातले. त्यांचे तिकीट कापण्याचे प्रयत्न झाले. राजकारणात छक्केपंजे न करता पक्षाशी इमानदारी ठेवून राजकारण केल्याचा यावेळी त्यांना लाभ झाला. वडील अशोक पाटील डोणगावकर यांच्या राजकीय संबंधाचे पुण्य त्यांच्या कामी आले.
गेल्या पाच वर्षात आमदार मोनिकाताई राजळे यांनी मतदारसंघात तब्बल अकराशे कोटीची विकासकामे केली. मतदारसंघातील प्रत्येक गावाशी त्यांनी वैयक्तिक संपर्क ठेवला. सर्वांच्या सुखदुःखात त्या सहभागी झाल्या. बहुदा कोणाचा अंत्यविधी, दहावाही त्यांनी सोडला नाही, साधा फोन करून निरोप दिला तरी त्या एखाद्याच्या लग्नकार्यात, घरगुती समारंभात आहेर घेऊन उपस्थिती लावत, ही त्यांची खासियत आहे. कोणत्याही क्षणी त्यांच्या डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असते. समोरच्याला दादा, भाऊ म्हणून जवळीक साधण्यात त्या वाकबगार आहेत. या बाबी किरकोळ वाटल्या तरी त्या मतदारांना भावल्या आहेत.