कराड -माजी मुख्यमंत्री तसेच कराड दक्षिणचे विद्यमान आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड शहरातील स्वस्त धान्य दुकानांना प्रत्यक्ष भेट दिली. या दुकानांमधून योग्य पद्धतीने धान्यवाटप होते का याची माहिती घेतली.
आ. चव्हाण यांनी माजी नगरसेवक अशोकराव पाटील यांच्या प्रियदर्शनी स्वस्त धान्य दुकानाला भेट दिली. तसेच तिथे उपस्थित लाभार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी त्यांच्या लक्षात आले की नागरिकांना बोटाचे ठसे घेऊन धान्य दिले जात आहे. परंतु, ज्या नागरिकांच्या ठसे उमटत नाहीत. असे लोक धान्य घेण्यापासून वंचित रहात आहेत.
या गोष्टीची दखल घेत त्यांनी तात्काळ अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांशी फोनवरून चर्चा करून या तांत्रिक अडचणींबद्दल कल्पना दिली. तसेच असे अनेक लोक राज्यात या तांत्रिक अडचणीमुळे स्वस्त धान्य मिळण्यापासून वंचित असतील म्हणून राज्य सरकारतर्फे एक भरारी पथक प्रत्येक शहरात पाठवून संबंधित लाभार्थ्यांना त्यांच्या तांत्रिक अडचणी दूर करून शासकीय योजनांचा लाभ घेता येईल अशी व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या.
उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या समवेत युवानेते इंद्रजित चव्हाण, प्रदेश युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस शिवराज मोरे, कराड दक्षिण कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, कॉंग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण, शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजित गुजर, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, प्रदीप जाधव आदी उपस्थित होते.