आ. जगतापांवर खोटे आरोप केल्यास कायदेशीर कारवाई : बारस्कर

वैफल्यग्रस्त झालेल्या टोळीकडून अपेक्षा नसल्याची केली टीका त्यांची विश्‍वासार्हता संपल्याने केले जात आहेत आरोप
नगर –
कायद्याचा धाक नाही. पोलीस प्रशासनावर विश्‍वास नाही. आम्ही करू तो कायदा या हिटलरशाही धोरणाला आता नागरिक भीक घालणार नाही. त्यामुळेच संबंधित अभियंत्याने महापालिकेत मारहाण करुन दंगा करणाऱ्या गुंडावर गुन्हा दाखल केला आहे. जी व्हिडिओ क्‍लिप व्हायरल झाली आहे, त्यातली शब्दरचना राष्ट्रवादीने लिहून दिलेली नाही. पराभवाने वैफल्यग्रस्त झालेल्या टोळीकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा नाही, असा टोला लगावत आमदार संग्राम जगताप यांच्यावर खोटे आरोप केले, तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते संपत बारस्कर यांनी दिला आहे.
शिवसेनेच्या पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे उत्तर दिले आहे.त्यात म्हटले की, नगर शहरात स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी कोण कायदा सुव्यवस्था हातात घेतात. हे नगरकरांना चांगलेच माहिती आहे.

महापालिकेत घडलेली घटना व झालेली मारहाण तुमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याने केली, नागरिकांनी नाही. त्या व्यक्तीला इतकेही भान राहिले नाही की, आपल्या सोबत महिला आहेत. त्यांच्यासमोर गलिच्छ पध्दतीने शिवीगाळ केली. त्यामुळे शिवसेना आणि शिवसेनेतील नेत्यांचा सुसंस्कृतपणा दिसून आला. नेहमी तेच लोक, तेच आरोप याला नगरची जनता कंटाळली असून या लोकांबद्दल विश्‍वासहर्ता न राहिल्यामुळे या पध्दतीचे आरोप केले जात आहेत.गाडे असो फुलसौंदर हे पराभवाने वैफल्यग्रस्त झाले आहेत. लोंढेंचे तर सामाजिक काम सगळ्या नगरला माहिती आहे.

मनपा निवडणुकीत मनसेच्या उमेदवाराला कसा आध्यात्मिक धडा दिला होता, हे काही लपून राहिलेली गोष्ट नाही. आम्ही केलेल्या आंदोलनाबाबत हे संदर्भ देतात. पण आम्ही केलेले आंदोलन हे प्रतिकारात्मक पध्दतीचे असतात. जेणेकरुन अधिकाऱ्यांचे त्या समस्याकडे लक्ष वेधले जाईल. तुमच्यासारखे आम्ही अधिकाऱ्यांना मारहाण करत नाही किंवा शिवीगाळ करत नाही. उस्फूर्त प्रतिक्रिया कोणती असते, याची माहिती तरी आहे का? जर तुमच्या पध्दतीने अशी उस्फूर्त प्रतिक्रिया असेल, तर यातून आपल्या पक्षांतर्गत संस्कृती दिसून येते. आपणच तरुणांना भडकावून कायदा हातात घ्यायचे शिकवता. गुन्ह्याबाबत पोलिस प्रशासन सर्व बाबींची पडताळणी करूनच गुन्हे दाखल करते आणि आपण म्हटल्याप्रमाणे खोटा गुन्हा जर आमदार जगताप यांनी दाखल करायला सांगितला असेल तर पुरावे सादर करावेत, असे आव्हानही राष्ट्रवादीकडून देण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.