पारनेर -आठ महिन्यांची मुलगी, दोन वर्षांचा मुलगा यांच्या दुधाची तसेच कुटुंबाच्या जेवणाची व्यवस्था न करू शकल्याने सुपे येथे वास्तव्यास असलेल्या मध्यप्रदेशातील राजवर्धन या मजुराच्या मनात आत्महत्येचा विचार घोळत होता. त्यापूर्वी त्याने आ. नीलेश लंके यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला. त्यानंतर आ. लंके यांनी या कुटुंबास तत्काळ मदत केल्याने व आपल्या गावी पाठविण्याची सोय केल्याने हाती पैसा नसल्याने निराश झालेल्या राजवर्धनच्या कुटुंबासाठी आ. लंके देवदूतच ठरल्याची भावना झाली आहे.
मागील महिन्यात अचानक लॉकडाउनची घोषणा झाली आणि सुपे पसिरात पत्नी, आठ महिन्यांची मुलगी व दोन वर्षांच्या मुलासह राहणाऱ्या राजवर्धन या बांधकाम मजुराच्या कुटुंबाची उपासमार सुरू झाली. सुरुवातीस पाण्याबरोबर बिस्किटे खाऊन त्यांनी दिवस काढले. पुढे मुलांना दूध मिळत नसल्याने ती रडू लागली. पती-पत्नीच्या पोटात अन्नाचा कण नसल्याने, हे दिवस काढायचे तरी कसे, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा होता. कोणताही आधार नसल्याचे खचलेल्या राजवर्धनने आत्महत्या करून जीवयात्रा संपविण्याचा विचार केला. तशातच ज्यांच्या जेवणाची सोय नसेल, यांनी संपर्क साधरण्याचे आवाहन करणारी पोष्ट फेसबुकवर राजवर्धनच्या वाचण्यात आली. त्याने तत्काळ दूरध्वनी केला. मात्र दूरध्वनी वारंवार व्यस्त येत असल्याने तो निराश झाला.
काही वेळानंतर त्याच क्रमांकावरून राजवर्धनला दूरध्वनी आला. परंतु तो घेईपर्यंत तो कट झाला. त्यानंतर राजवर्धनने या पोस्टमध्ये दिलेल्या आ. लंके यांच्या संपर्क कार्यालयाच्या नंबरवर फोन केला. त्यानंतर मात्र त्याच्या प्रयत्नांना यश आले व त्याच्या कुटुंबाच्या जेवणाची व दुधाची व्यवस्था तत्काळ करण्यात आली. रोजगार बंद झाल्यामुळे या कुटुंबास मध्यप्रदेशातील इंदूर येथे जायचे होते. योगायोगाने इंदूर येथे जाणारे वाहन उपलब्ध झाल्याने आ. लंके यांनी राजवर्धनच्या कुटुंबाची इंदूर येथे जाण्याची व्यवस्था केली.अनवाणी असलेल्या पत्नी तसेच मुलांसाठी चप्पल घेऊन दिली. एकवेळी आत्महत्येचा विचार मनात घोळत असताना आ. लंके यांनी राजवर्धनची घरी जाण्याची सोय केल् याने ते त्याच्यासाठी देवदूतच ठरले.