बुधवार पेठेतील ‘रेड लाईट’ एरियात कोम्बिंग ऑपरेशन; 18 मुलींची सुटका

पुणे – फरासखाना पोलिसांनी बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात कोम्बिंग ऑपरेशन राबवत 18 मुलींची सुटका केली. या मुलींकडून जबरदस्तीने वेश्‍या व्यवसाय करुन घेतला जात होता. या प्रकरणी नऊ घरमालकांविरोधात पीटा अंतर्गत फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जहाना मोहंमद रजा शेख (रा.माचीस बिल्डींग, बुधवार पेठ), रुपा अब्दुलखान (रा.माचीस बिल्डींग, बुधवार पेठ), मैली टिकातमांग (रा.मर्गीगल्ली, बुधवार पेठ), तारा बकतल तमांग (बेलकम बिल्डींग, बुधवार पेठ), शिमला साथमन तमांग (बेलकम बिल्डींग, बुधवार पेठ), यास्मीन मोबीन शेख (बेलकम बिल्डींग, बुधवार पेठ), मुख्तार शेख (कोहिनूर बिल्डींग, बुधवार पेठ), काज गोरे तमांग (बुधवार पेठ), गंगुबाई कांबळे (बुधवार पेठ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांना बुधवार पेठेत काही घरांमध्ये जबरदस्तीने मुलींकडून वेश्‍या व्यवसाय करुन घेत असल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार त्यांनी बुधवार पेठ व शुक्रवार पेठेतील काही भागांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवले. यामध्ये परिमंडळ एकमधील 15 अधिकारी व 70 पोलीस कर्मचारी रविवारी दुपारी सहभागी झाले होते. यावेळी कोम्बिंग ऑपरेशन राबवत सर्व परिसर पिंजून काढण्यात आला. त्यामध्ये घर मालक व व्यवस्थापक अशा नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्या ताब्यातून 18 मुलींची सुटका करण्यात आली आहे. या मुलींकडे चौकशी केली असता त्यांनी घरमालक व व्यवस्थापक त्यांच्या मर्जीविरुध्द वेश्‍याव्यवसाय करुन घेत असल्याचे सांगितले. उत्पन्नाच्या 50 टक्के हिस्सा घर मालक स्वत: घेत होते. या मुलींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना हडपसर येथील रेस्क्‍यु फाऊंडेशन येथे पाठविण्याचे आदेश देण्यात आले.

ही कारवाई पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त प्रदीप आफळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.