पिंपरी | ऑल सिनियर सिटीझन असोसिएशनतर्फे श्रावणाचे रंग

पिंपरी, (प्रतिनिधी) – अधून मधून पडणाऱ्या पावसाच्या सरी, वातावरणातील सुखद गारवा या आल्हाददायक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर वर्षाऋतुशी नातं सांगणाऱ्या सदाबहार गायन, वादन आणि नृत्याच्या सादरीकरणाचा पिंपळे सौदागर परिसरातील महिलांनी आनंद लुटला.
निमित्त होते ” श्रावणाचे रंग ” या कार्यक्रमाचे. येथील ऑल सिनियर सिटीझन असोसिएशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
असोसिएशनच्या पदाधिकारी शकुंतला शिंदे , निर्मला कासार तसेच शोभा राजगुरे यांच्या मार्गदर्शनाखाली कुणाल आयकॉन रोडवरील लक्षद्वीप पॅलेसच्या जलमहल हॉलमध्ये मंगळवारी सायंकाळी झालेल्या या रंगारंग कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
डॉ. कुंदा भिसे यांची या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमात ” रिमझिम बरसता सावन होगा ” , ” दारी पाऊस पडतो “, ” जारे जारे कारी बदरिया “, ” सावन का महिना.. “, या गीतांना तसेच पाऊस गीतावरील नृत्याच्या सादरीकरणाला महिलांनी भरभरून दाद दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.सुभाष पवार, सखाराम ढाकणे, अनिल कुलकर्णी, सुभाष पाटील, विलास जोशी, रमेश वाणी, रमेश चांडगे, जयपाल सिदणाळे, अशोक येळंबकर, सुभाष विधाते, अनिलकुमार शाह यांचे सहकार्य लाभले. कविता, सुविचार यांची सूत्रसंचलनामध्ये पेरणी करत शकुंतला शिंदे यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.





