Colombia Plane Crash : कोलंबियाच्या उत्तर-पूर्व भागात बुधवारी (२८ जानेवारी) एक भीषण विमान अपघात झाला. या अपघातात सरकारी एअरलाइन सॅटेनाचे (Satena) छोटे विमान कोसळले आणि त्यातील १५ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात कोलंबियाच्या हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जचे सदस्य डायोजेनेस क्विंटेरो आणि आगामी निवडणुकीतील उमेदवार कार्लोस साल्सेडो यांच्यासह सर्वजण ठार झाले. या घटनेने अख्खा देश सुन्न झाला असून, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विमान कुकुटा विमानतळावरून सकाळी ११:४२ वाजता (स्थानिक वेळ) उड्डाण केले आणि ओकाना (Ocaña) येथे उतरण्यापूर्वीच, सुमारे १२ मिनिटांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. हा प्रवास साधारण ४० मिनिटांचा होता. विमान व्हेनेझुएलाच्या सीमेजवळील नॉर्टे दे सांतांदेर प्रांतातील ग्रामीण, डोंगराळ आणि घनदाट जंगल क्षेत्रात कोसळले. अपघाताचे ठिकाण क्यूरासिका जवळील खडकाळ भागात असून, हवामान अस्थिर आणि बदलत असते. कोणीही वाचले नाही Colombia Plane Crash कोलंबियाच्या सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटी आणि सॅटेनाने पुष्टी केली की, विमानातील कोणीही जीवित राहिला नाही. स्थानिक रहिवाशांनी अपघाताची माहिती दिल्यानंतर शोध व बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. आतापर्यंत मृतदेह सापडले असून, राहत कार्य सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, पण डोंगराळ भाग, घनदाट जंगल, खराब दृश्यमानता किंवा तांत्रिक बिघाड यामुळे असण्याची शक्यता आहे. सरकारने तपास सुरू केला असून, हवाई दलाच्या मदतीने शोध मोहीम राबवली जात आहे. मृतांमध्ये प्रमुख नेते डायोजेनेस क्विंटेरो (३६ वर्षे) कॅटाटुम्बो भागाचे खासदार. ते आंतरिक सशस्त्र संघर्षातील पीडितांचे प्रतिनिधित्व करत होते आणि मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनाने सीमावर्ती भागातील संघर्षग्रस्त समुदायात शोककळा पसरली.