पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शाळा व महाविद्यालये पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र वरिष्ठ महाविद्यालये सुरू ठेवावीत की नाही, याबाबत संभ्रम दूर झाला आहे. यासंदर्भात उच्च शिक्षण विभागाने परिपत्रक प्रसिद्ध केल्याने फक्त पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील संलग्नित महाविद्यालये व मान्यताप्राप्त संस्था बंद राहतील. मात्र पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे ग्रामीण, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालये सुरू राहणार आहेत.
याबाबत उच्च शिक्षण विभागाचे पुणे विभागीय सहसंचालक डॉ. मोहन खताळ यांनी परिपत्रक आज प्रसिद्ध केले. राज्य शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील कृषी, अकृषी, अर्थसहाय्यीत, अभिमत विद्यापीठ, अशासकीय अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये व शेैक्षणिक संस्थांना राज्य शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश उच्च शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र पूर्वनियोजित लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांचे कामकाज सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुणे विद्यापीठाने आजपासून पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वरिष्ठ महाविद्यालये आजपासून बंद ठेवण्याच्या सूचना दिले आहेत. मात्र विद्यापीठ कार्यक्षेत्रात असलेल्या पुणे ग्रामीण, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालये सुरू राहतील. परंतु महाविद्यालय व संस्थांमधील प्रशासकीय कामकाज सुरू राहतील. तसेच करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या सूचनाही विद्यापीठाने महाविद्यालयांना दिले आहेत.
व्यावसायिक अभ्यासक्रम संस्थाही बंद
पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व तंत्रनिकेतन व व्यावसायिक अभ्यासक्रम संस्थांही बंद ठेवण्याचे आदेश पुणे विभागीय तंत्रशिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. राज्य शासनाचे आदेश पुढील आदेश येईपर्यंत विद्यार्थी अनावश्यक फिरणार नाही, याची संबंधित संस्थांनी सूचना द्यावेत, अशी माहिती तंत्रशिक्षणच्या पुणे विभागीय सहसंचालक डॉ. डी. आर. नंदनवार यांनी दिली.