प्रभात वृत्तसेवा पुणे – वडगाव बुद्रुक परिसरात सिंहगड महाविद्यालय रस्त्यावर स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. स्वप्नील संपतराव पवार (२३, रा. शिवाजीनगर, कडेगाव, जि. सांगली) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. तर दुचाकीवरील सहप्रवासी तरुणी ऋतुजा कदम हिला दुखापत झाली आहे. या प्रकरणी बसचालक धनाजी शंकर चव्हाण (४१, रा. ओंकार हाईट्स, नऱ्हे) याला अटक करण्यात आली आहे. दुचाकीस्वार स्वप्नील आणि ऋतुजा हे शुक्रवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास वडगाव बुद्रुकमधील सिंहगड महाविद्यालय रस्त्याने निघाले होते. त्या वेळी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसने दुचाकीस्वार स्वप्नील आणि ऋतुजा यांना धडक दिली. यामध्ये स्वप्नील गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक भुपेश साळुंके पुढील तपास करीत आहेत.