श्रीनगर- काश्मीर खोऱ्यातील थंडीचा कडाका अजून कायम आहे. शनिवारी खोऱ्यातील अनेक ठिकाणचा पारा शून्याच्या खाली गेला होता. हवामान खात्यातील नोंदीनुसार श्रीनगरचे आजचे तापमान उणे 7.2 अंश सेल्सियस इतके होते. तर काझीगंद येथील तापमान उणे 8.8 अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले आहे. गुलमर्गचे तापमान उणे 10 अंश इतके होते.
पहलगाम, कुपवाडा, कोकेर्नग, आदी ठिकाणचे तापमानही शून्याच्या खालीच होते. त्यामुळे अनेक ठिकाणचे पाणवठे गोठले असून नळाने येणारे पाणीही गोठल्याने पाणीपुरवठ्यात अडथळे निर्माण झाले आहेत. पुढील दोन ते तीन दिवस तरी ही स्थिती अशीच कायम राहील असे वेधशाळेतील सूत्रांचे म्हणणे आहे.
काश्मिरात हिवाळ्याच्या श्रृतीत एका विशिष्ट कालावधीत चाळीस दिवस तरी सलग कमालीचा गारठा असतो त्याला तेथील स्थानिक भाषेत चिल्लाई कलान असे म्हणतात. सध्या तेथे हा चिल्लाई कलानचा कालावधी सुरू आहे. तो 21 डिसेंबरपासून सुरू झाला असून तो किमान 31 जानेवारीपर्यंत तरी कायम राहणार आहे. नंतर तेथे 20 दिवसांचा चिल्लाई खर्द म्हणजे कमी थंडीचा कालावधी आणि दहा दिवसांचा चिल्लाई बच्चा हा हलक्या थंडीचा कालावधी असतो.