शिरूर : शिरूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर लक्षणीयरीत्या वाढला असून पहाटे व रात्रीच्या वेळी गारठा प्रचंड जाणवत आहे. किमान तापमानात सातत्याने घट होत असल्याने शेतकरी, मजूर, विद्यार्थी व नागरिकांना थंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी रात्रीच्या वेळी व पहाटे शेकोट्या पेटविल्या जात असून गावोगावी शेकोटीभोवती नागरिक गोळा होताना दिसत आहेत. विशेषत: ग्रामीण भागात पहाटेच्या वेळी धुके आणि गार वारा यामुळे वातावरण अधिक थंड बनले आहे. शेतात कामासाठी जाणाऱ्या शेतकरी व मजुरांनी स्वेटर, मफलर, टोपी आदींचा वापर वाढवला असून अनेक ठिकाणी चहा टपऱ्या, हॉटेल्स आणि वस्ती,बसस्थानक परिसरात शेकोट्या पेटवून लोक थंडीपासून उब घेत आहेत. थंडीचा परिणाम दैनंदिन जीवनावरही होत आहे. लहान मुले, वृद्ध नागरिक व आजारी व्यक्तींना विशेष काळजी घ्यावी लागत असून आरोग्य विभागाकडूनही सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांपासून बचावासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, थंडी वाढल्याने ऊस तोड कामगार, बांधकाम मजूर तसेच पहाटे प्रवास करणाऱ्या नागरिकांना अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी कामाच्या वेळा पुढे ढकलल्या जात असून काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी झाल्याचे चित्र आहे. एकूणच शिरूर तालुक्यात पुढील काही दिवसांत थंडी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी उबदार कपडे वापरणे, गरम पाणी पिणे व आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.