प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरासह जिल्ह्यातल किमान तापमानात गेल्या २४ तासात एक ते दोन अंशाने वाढ झाली असली तरी थंडीचा जोर कायम आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरणामुळे दुपारी हलकासा गारवा जाणवत होता. हवेली परिसरात सर्वात कमी ९.३ तर तळेगांव परिसरात ९.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पुढील ४८ तासात पुणे जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढणार असून, थंडीची लाट येण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.रविवारी (दि. १) थंडीचा पारा ७ अंशापर्यंत खाली आल्यामुळे शहर आणि जिल्ह्यात बहुतांश भागात थंडीची लाट आल्यासारखी परिस्थिती होती. विशेषत: एनडीए, पाषाण, खडकवासला, धायरी, कात्रज, आंबेगांव परिसरात हुडहुडी भरणारी थंडी जाणवत होती. जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी कडाक्याची थंडी होती. गेल्या २४ तासात किमान तापमानात एक ते दोन अंशाने घट झाल्यामुळे पारा आज ९ अंशाच्या पुढे गेला. पहाटे धुके आणि थंडी तर दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरणाचा लपंडाव सुरू होता. पुढील दोन ते तीन दिवस शहरासह जिल्ह्यातील हवामानात फारसा बदल होणार नसून, किमान तापमानात एक ते दोन अंशाने घट होईल. किमान तापमान हवेली ९.३, तळेगांव दाभाडे ९.८, शिवाजीनगर आणि पाषाण १०, माळीण १०.२, दौंड १०.३, बारामती १०.७, शिरूर १०.९, आंबेगांव ११.२, कुरवंडे १२.९, कोरेगांव पार्क १४.६, चिंचवड १५.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.