Cocktail 2: बॉलिवूडमध्ये सध्या ‘कॉकटेल 2’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. दीपिका पादुकोण पुन्हा एकदा ‘वेरोनिका’ या तिच्या लोकप्रिय भूमिकेत दिसणार का, याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र या चर्चांमागची खरी परिस्थिती थोडी वेगळी आहे. २०१२ मध्ये आलेल्या कॉकटेल या चित्रपटात दीपिकाने ‘वेरोनिका’ ही बिनधास्त, आत्मविश्वासी आणि भावनिक मुलगी साकारली होती. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात आजही कायम आहे. त्या चित्रपटात सैफ अली खान आणि डायना पेंटी यांच्यासोबतचा लव्ह ट्रायंगल विशेष गाजला होता. आता या चित्रपटाचा सिक्वेल ‘कॉकटेल 2’ जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा वेरोनिकाच्या पुनरागमनाच्या चर्चा रंगल्या आहेत. सोशल मीडियावर, विशेषतः रेडिटवरील एका पोस्टमुळे या अफवांना सुरुवात झाली. त्या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला की दीपिका काही महिन्यांपूर्वी मॅडॉक फिल्म्सच्या ऑफिसमध्ये गेली होती आणि तिला ‘कॉकटेल 2’मध्ये कॅमिओसाठी संपर्क करण्यात आला होता. इतकंच नाही, तर तिने शूटिंगही पूर्ण केल्याचा दावा त्या पोस्टमध्ये करण्यात आला. Cocktail 2 मात्र या सगळ्या चर्चांवर अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. ना दीपिका पादुकोणने, ना चित्रपटाच्या निर्मात्यांनी किंवा दिग्दर्शकांनी याबाबत कोणतीही माहिती दिली आहे. त्यामुळे सध्या या गोष्टी केवळ अफवा असल्याचं मानलं जात आहे. दरम्यान, ‘कॉकटेल 2’मध्ये शाहिद कपूर, कृति सेनन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट होमी अदजानिया यांनी दिग्दर्शित केला आहे. जरी हा सिक्वेल असला तरी याची कथा पूर्णपणे नवीन आणि वेगळी असेल, असं सांगितलं जात आहे. प्रेम, नातेसंबंध आणि आधुनिक रिलेशनशिप्स यांचा वेगळ्या पद्धतीने उलगडा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच पहिल गाणंही नुकतंच प्रदर्शित झालं असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे ‘कॉकटेल 2’बद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. हा चित्रपट १९ जून रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. एकूणच, दीपिका पादुकोणच्या कॅमिओबाबतच्या चर्चा सध्या रंगात असल्या तरी त्या फक्त अफवांपुरत्याच मर्यादित आहेत. अधिकृत घोषणा होईपर्यंत चाहत्यांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.