Satara News | कोक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया जिल्ह्यामध्ये प्रथमच यशस्वी

सातारा, (प्रतिनिधी)- येथील ठोके ईएनटी हॉस्पिटलमध्ये जिल्ह्यातील पहिली कोक्लियर इम्प्लांट ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया दोन वर्षाच्या बालिकेवर यशस्वीपणे येथे पार पडली. डॉ. चैतन्य ठोके यांनी ही शस्त्रक्रिया मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमधील ईएनटी विभाग प्रमुख डॉ. हेतल मार्फतीया यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
शस्त्रक्रियेदरम्यान डॉ. अमृता बोकील व डॉ. मुग्धा महाजन या भूलतज्ज्ञांचे मोलाचे सहकार्य लाभले. डॉ. जयवंत ठोके यांनी १९८२ मध्ये सुरु केलेल्या या हॉस्पिटलने वेळोवेळी प्रगत यंत्रणेचा अवलंब करून जिल्ह्यामधील रुग्णांकरिता आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली आहे.
कोक्लियर इम्प्लांट ही एक अत्याधुनिक वैद्यकीय प्रक्रिया आहे. श्रवणक्षमता गमावलेल्या व्यक्तींना ऐकण्याची व संवाद साधण्याची क्षमता या प्रक्रियेद्वारे परत मिळवून देते. विशेषतः जे बाळ जन्मताच मूकबधिर असते त्या बाळांसाठी ही शस्त्रक्रिया एक वरदान आहे. यासाठी त्या बाळांचे लवकरात लवकर निदान होऊन उपचार होणे गरजेचे आहे. या शस्त्रक्रियेमध्ये कोक्लियर इम्प्लांटच्या (Chochlear implant) साह्याने ध्वनी बाळाच्या थेट अंतर कर्णामध्ये विशिष्ट इलेक्ट्रोड्सद्वारे सोडले जातात व ते थेट मेंदूला पोचवले जातात आणि नंतर थेरपी देऊन बोलण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या ऑपरेशनसाठी ठोके हॉस्पिटलमध्ये अद्ययावत सोयी उपलब्ध आहेत.
तसेच स्पीच थेरपीसाठी राजकुमार घाडगे आणि कांचन घाडगे या प्रशिक्षित ऑडिलॉजिस्ट यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
“ही कामगिरी म्हणजे साताऱ्यातील आरोग्य व्यवस्थेच्या वाढत्या क्षमतेचे प्रतीक आहे. प्रगत वैद्यकीय सुविधा लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे डॉ. चैतन्य ठोके यांनी सांगितले,





