Cocaine Seized : वसईमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! 12 कोटींचे कोकेन जप्त

विरार : वसई- विरार शहरात अमली पदार्थांच्या विक्रीवर बंदी आणण्यासाठी पोलिसांची यंत्रणा सरसावली आहे. वसईच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ११ कोटी ५८ लाख ४१ हजार १०० रुपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करुन आरोपी नायजेरियन व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. सदर आरोपीच्या विरोधात मुंबईच्या आझाद नगर पोलीस ठाण्यात अमली पदार्थ तस्करीबाबत गुन्हा दाखल आहे.
वसई पूर्वेकडील वालीव येथील महेश अपार्टमेंट एव्हरशाईन सिटी या इमारतीच्या तिसर्या आणि चौथ्या मजल्यावर नायजेरीयन देशाच्या नागरिक २२ किलो ८६५ ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन (एम डी) व ४८ ग्रॅम कोकेन अंमली पदार्थाचा साठा करुन ग्राहकांना विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखा, कक्ष २ यांना प्राप्त झाली होती. गुन्हे शाखा कक्षाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक समीर अहिरराय यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट कार्यालयाचे पोलीस अधिकारी आणि अंमलदाराचे पथकाने सदर ठिकाणी छापा मारला.यावेळी आरोपी व्हिक्टर ओडीचीन्मा ओनुवाला उर्फ डाईक रेमंड चय (३७ वर्ष )आढळून आला.
पोलिसांनी राहत्या घराची घरझडती घेतली असता घरातून त्याच्या स्वतःचा डाईक रेमंड या नावाचा बनावट पासपोर्ट मिळून आला आहे. तसेच घरझडती दरम्यान मिळालेल्या चावीच्या आधारे सदर बिल्डींगच्या चौथ्या मजल्यावरील रुममधून मेफेड्रोन नावाचा अंमलीपदार्थ आणि अंमलीपदार्थाच्या गुणवत्तेत बदल करण्याकरिता वापरले जाणारे केमिकल मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले. यावेळी ईग्वेनुचा चुक्चेबुका चिमाओबी लेगॉस(देश नायझेरीया) याचे पासपोर्ट मिळून आल्याने त्याचाही नमूद गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी वालीच पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.





