डोर्लेवाडीच्या सुनील निंबाळकरने आई-वडिलांच्या कष्टाचे केले चीज
डोर्लेवाडी – जिद्द आणि चिकाटी असेल तर उंच शिखरावरती पोहोचता येते आणि हेच सिद्ध करून दाखवलंय बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील वैदू समाजातील सुनील शामराव निंबाळकर याने. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही खडतर परिस्थितीमध्ये रात्रं-दिवस अभ्यास करून सनदी लेखापालच्या (सीए) परीक्षेत उत्तीर्ण होऊन चांगले यश संपादन केले आहे.
महाराष्ट्रात वैदू समाज अनेक ठिकाणी विखुरला गेला आहे. पोटापाण्यासाठी भटकंती करणारा म्हणून या समाजाची ओळख आहे. या समाजाचा खरा व्यवसाय तो दारोदारी फिरून डबा, चाळण, खेळणी विकणे आहे. सुनीलचे आई-वडील देखील हाच व्यवसाय करतात. या व्यवसायातून आलेल्या पैशातून सुनीलच्या शिक्षणासाठी त्यांनी पैसे पुरवले आहेत. या समाजात अजूनही अशिक्षितांचे प्रमाण जास्त आहे मात्र, याला डोर्लेवाडीतील सुनील अपवाद ठरला आहे. त्याने मोठ्या मेहनतीने सीए परीक्षेत यश संपादन करून आपल्या अशिक्षित आई-वडिलांचा, समाजाचा आणि गावाचा विश्वास संपादन केला आहे.
अपयश हीच यशाची खरी पायरी आहे. यामुळे तरुणांनी शिक्षण घेत असताना अपयशाची काळजी कधीच करू नये. मनात जिद्द चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे न खचता प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते, अशी प्रतिक्रिया सुनील निंबाळकरने दिली.
आमचा मुलगा काय झाला आहे हे आम्हाला माहीत नाही फक्त तो अधिकारी झाला आहे एवढंच माहिती आहे. त्याच्या पत्नीनेदेखील नोकरी करून त्याच्या शिक्षणासाठी हातभार लावला आहे तिचेदेखील कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. माझ्या मुलाने आमच्या कष्टाचे चीज केल्याने आम्हाला त्याचा अभिमान आहे.
– शामराव निंबाळकर, सुनीलचे वडील