Fuel Supply : देशात सध्या इंधनाची कोणतीही कमतरता नाही. विशेषतः घरगुती वापरासाठी लागणारा एलपीजी, वाहनांसाठीचा सीएनजी आणि पाइपद्वारे पुरवला जाणारा नैसर्गिक वायू यांचा पुरवठा १०० टक्के सुरळीत सुरू आहे. वितरण साखळीमध्ये कोणताही अडथळा नसून ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार इंधन उपलब्ध करून दिले जात आहे, अशी माहिती मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम आणि नॅचरल गॅसच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी दिली. सुजाता शर्मा म्हणाल्या, देशभरात सध्या २५,००० वितरकांचे जाळे कार्यरत असून, कोणत्याही वितरकाकडे गॅसची टंचाई नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. दररोज सुमारे ७५,००० सिलेंडरचे बुकिंग होत असून, ही मागणी पूर्ण करण्याची क्षमता यंत्रणेकडे आहे. भविष्यातील निकड लक्षात घेऊन सरकारने एलपीजीच्या उत्पादनात ३० टक्क्यांनी वाढ केली आहे. कोणाकडेही गॅसचा तुटवडा भासणार नाही, याची काळजी उत्पादन स्तरावर घेतली जात आहे, असे त्यांनी सांगितले.