‘नाणार प्रकल्प अन्यत्र हलवा’ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पंतप्रधानांना पत्र

मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून रत्नागिरीमध्ये नाणार येथे होणारा कोट्यवधी डॉलर्सचा रिफायनरी प्रकल्प अन्य ठिकाणी हलवण्याचा प्रस्ताव दिला आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आज ही माहिती दिली.
हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे बांधण्याचा प्रस्ताव होता, परंतु स्थानिक संघटना आणि राज्यातील सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधामुळे तो रखडला आहे.मुख्यमंत्र्यांनी जानेवारीतच पंतप्रधानांना हा रिफायनरी प्रकल्प दुसऱ्या ठिकाणी हलवण्याबाबत पत्र लिहिले आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.हा प्रकल्प सुमारे 60 अब्ज डॉलर्सचा आहे. सौदी अरेबियातील आर्मको आणि अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनी द्वारे संयुक्तपणे तो उभारला जाणार आहे.
रत्नागिरीतील जैतापूर येथे 9,000 मेगावॅटहून अधिक क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्पही उभारण्यात येणार आहे. रत्नागिरी दौऱ्यावर असताना राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे की, कोकणात नियोजित रिफायनरी प्रकल्प स्थानिकांचा सल्ला घेतल्यानंतर आणि त्यांची संमती घेतल्यानंतरच त्यावर निर्णय होईल.
स्थानिकांचा विरोध असल्यास कोणताही प्रकल्प कोकणात होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी सांगितले होते की या प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाची आशा आहे कारण महाराष्ट्र सरकार त्याबद्दल आपले मत बदलेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती.





