मुख्यमंत्री फडणवीस लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता

यवतमाळ : राज्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले असताना, शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर, महायुती सरकारमधील यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा करतील, असे संकेत त्यांनी दिले. ते आज यवतमाळमधील पुसद येथे वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात बोलत होते.
मंत्रिमंडळात कर्जमाफीवर चर्चा
हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या ४६ व्या स्मृतिदिनानिमित्त पुसद येथे आयोजित कार्यक्रमात १३ प्रयोगशील शेतकऱ्यांना कृषी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना मंत्री राठोड म्हणाले, “संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीबाबत मंत्रिमंडळात सविस्तर चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीस लवकरच यासंदर्भात मोठी घोषणा करतील.” त्यांनी पुसदच्या माळ पठारावरील ४० दुष्काळग्रस्त गावांना पाणीपुरवठा करून दुष्काळ कायमचा दूर करण्याचे आश्वासनही दिले.
महायुतीच्या नेत्यांचे आश्वासन
यापूर्वी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी “मुख्यमंत्री लवकरच कर्जमाफीबाबत निर्णय घेतील,” असे सांगितले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही “महायुतीच्या जाहीरनाम्यानुसार कर्जमाफी केली जाईल,” असे स्पष्ट केले होते. आता राठोड यांच्या विधानाने शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणींना शेतकरीपुत्राची साथ
राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची गरज असल्याचे मान्य केले आहे. “मी स्वतः शेतकरीपुत्र असल्याने शेतकऱ्यांच्या व्यथा मला समजतात. कर्जमाफी आवश्यक आहे आणि याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह योग्य वेळी निर्णय घेतला जाईल,” असे भरणे यांनी नमूद केले.
विरोधकांची सातबारा कोरा करण्याची मागणी –
दरम्यान, विरोधी पक्षांकडून “शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा” अशी मागणी सातत्याने होत आहे. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी यासाठी आंदोलनही केले होते. या सर्व पार्श्वभूमीवर राठोड यांचे संकेत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत असून, कर्जमाफीची घोषणा कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





