हिंगोलीत ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; सरस्वती, पूर्णा नदीला पूर, पिके उद्ध्वस्त, 17 गावांचा संपर्क तुटला

हिंगोली – हिंगोली जिल्ह्यातील मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेल्या सेनगाव तालुक्यातील बरडा, पिंपरी, वझर खुर्द या गावांमध्ये काल, दि. 21 जुलै रोजी रात्री ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार माजवला. यामुळे सरस्वती आणि पूर्णा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून, नदीकाठच्या शेतीवर पाण्याचा लोंढा धडकल्याने सुमारे 100 हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली आहेत. वझर खुर्द येथील सरपंच भास्कर राघोजी चोरमारे यांनी ही माहिती दिली.
कापडसिंगी-लोणार महामार्गावरील वाहतूक ठप्प, 17 गावांचा संपर्क तुटला-
जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कापडसिंगी, वझर खुर्द, बन, बरडा यासह अनेक गावांच्या शिवारात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कापडसिंगी गावाजवळील महामार्गावर सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ता पुराच्या पाण्यात वाहून गेला.
ओढ्यातील पाणी थेट रस्त्यावरून वाहत असल्याने कापडसिंगी-लोणार महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे परिसरातील 17 गावांचा संपर्क तुटला असून, स्थानिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, प्रशासनाकडून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे आणि मदतीबाबत तातडीने पावले उचलण्याची मागणी होत आहे.





