पिंपरी | भात पिकाच्या बेणणीच्या कामाची लगबग

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – मान्सूनच्या पावसाची उघडीप मिळताच मावळ तालुक्यातील खरीप भात उत्पादक शेतकरी भात पिकाच्या बेणणीच्या कामाला लागले आहे. गेले तीन-चार दिवस मावळ तालुक्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे शेतीच्या या कामाला सुरुवात केली आहे.
यावर्षी मान्सूनच्या पावसाने संपूर्ण जुलै महिना मावळ तालुक्याला चांगलेच झोडपून काढलेले असून या पावसाने तालुक्यातील सर्व भात खाचरे १०० टक्के पाण्याने भरले आहेत. तालुक्यात सुमारे १३ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप भात पिकाची लावणी झालेली आहे.
मावळ तालुक्याचे कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ आणि त्यांच्या सर्व अधिकारी, कर्मचारी वर्गाने तालुक्यातील खरीप पिकाचे व्यवस्थित नियोजन आणि मार्गदर्शन केलेले असून यावर्षी सुमारे १३ हजार हेक्टर पर्यंत भात लागवड होईल असा अंदाज व्यक्त केलेला आहे.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि संपूर्ण जुलै महिना हा चांगला पावसाचा असल्यामुळे मावळ तालुक्यातील सर्व गावांमधील भाताच्या लागवडी पूर्ण झालेली आहेत. काही ठिकाणी सुमारे ४० ते ५० दिवसांपूर्वी या भात रोपांनी चांगला जीव धरलेला आहे. त्यामुळे शेतकरी आता बेणणीच्या कामाला लागलेली आहेत. असे मावळ तालुका सहाय्यक कृषी अधिकारी अक्षय ढुमणे यांनी सांगितले.
यावर्षी चांगल्या पावसामुळे भात खाचरे तुडुंब भरलेली असून भाताच्या पिकाची लावगड चांगली झालेली आहे. त्यामुळे शेतकरी अतिशय समाधानी असून पाऊस आणि उसंत देताच शेतकरी परिवार आपल्या शेतातील भात बेणणीच्या कामाला लागलेला आहे.
याशिवाय लावलेल्या भाताला खते देण्याचं कामही काही ठिकाणी शेतकरी करत आहेत.पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांना आपापल्या शेतामध्ये काम करण्यासाठी वेळ मिळत असल्याने कामही चांगली पूर्ण होत आहेत.




