हिंगोली : हवामान बदलाचा हरभरा पिकाला फटका; शेतकऱ्यांनी सहा एकरावर फिरवला नांगर

शिवशंकर निरगुडे
हिंगोली – जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील केंद्रा(बु) व परिसरात हरभरा पिकावर ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. फवारणी करूनही ‘मर’ रोगाचा नायनाट होत नाही. त्यामुळे त्रासाला कंटाळून केंद्रा (खुर्द) येथील दोन शेतकऱ्यांनी सहा एकरांतील हरभऱ्यावर नांगर फिरवला आहे. या वर्षी सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांच्या मागे संकटाची मालिका सुरू आहे. या वर्षी सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांवर सुरुवातीपासूनच विविध रोगांनी हल्ला केला आहे.
रब्बी हंगामातही अनेक शेतकऱ्यांनी हरभरा पेरला आहे. परंतु, हरभरा पिकावरही.रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. वेळोवेळी कृषी विभागाला सांगूनही मार्गदर्शन मिळत नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. खरीप हंगामातील सोयाबीनचे नुकसान येलो मोझॅक रोगामुळे झाले. त्यामुळे सोयाबीन पिकामध्ये कमालीची घट झाली आहे. सोयाबीनचे नुकसान भरून निघण्यासाठी शेतकऱ्यांनी हरभरा पिकाला पसंती दिली. परंतु, अवकाळी पाऊस व विविध रोगांमुळे हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी फुले लागली आहेत. परंतु, फुलांवर मोठ्या प्रमाणात अळ्या दिसून.येत आहेत. त्यामुळे हरभरा न ठेवलेला बरा, असे शेतकऱ्यांना वाटत आहे.
मागील पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे परिसरातील हरभरा व तुरीवर किंडाचा मोठा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकऱ्यांना या पिकावर किड नियंत्रणासाठी महागड्या कीटकनाशकच्या फवारन्या करून देखील किंडावर नियंत्रण होत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
नुकसान नको म्हणून घेतला निर्णय
सोयाबीन पिकाची काढणी करून हरभरा पीक घेतले होते. परंतु अवकाळी पावसामुळे हरभरा हे पीक हातचे गेले. यानंतर कृषी विभागाकडे किडीचा नायनाट करण्यासाठी कोणत्या औषधाची फवारणी करावी, अशी विनंती केली. परंतु, कृषी विभागाचे काही मार्गदर्शन मिळाले नाही. ‘मर’ रोग लागलेला हरभरा न ठेवलेला बरा म्हणून त्यावर नांगर फिरवला आहे. आता हरभरा दुबार पेरणी करायची असल्याचे शेतकरी नीलेश सुर्वे व गजाननराव जाधव यांनी सांगितले.





