पिंपरी | मावळातील पाटण लेणी परिसरात श्रमदानातून स्वच्छता

कार्ला, (वार्ताहर) – एकजूट लेणी अभ्यास प्रचार समूह व लेणी संवर्धन समितीच्या वतीने मावळ तालुक्यातील पाटण लेणी परिसरात श्रमदान करून परिसराची स्वच्छता केली. तसेच लेणी परिसरात दिशा दर्शक फलक लावण्यात आले. त्यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तरप्रदेशातील लेणी अभ्यासकांनी सहभाग घेतला.
एकजूट लेणी समूह संपूर्ण महाराष्ट्रातील लेणी येथे जाऊन त्या लेण्या स्वच्छ करून बौद्ध उपासकांना लेण्यांवर जाण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्या अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर तसेच उत्तर प्रदेश,
मध्य प्रदेश येथील लेणी अभ्यासक आणि लेणी जनजागृतीचे काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी भेट देऊन लेणी परिसरात साफसफाई करून लेणी स्वच्छ केली. त्याचबरोबर लेणी पाहण्याकरिता येणाऱ्या पर्यटकांना लेणी शोधण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून संपूर्ण लेणी परिसरात दिशा दर्शक फलक लावण्यात आले.
महाराष्ट्रातील अनेक लेण्यांचे विद्रूपीकरण काही समाज कंठकांकडून सातत्याने होत आहे. त्याच्या विरोधात ही एकजूट लेणी समूहातील सदस्य सातत्याने लढा लढत आहेत. २५०० हजार वर्षांचा हा धार्मिक, बौद्धिक वारसा टिकवणे आणि तो जतन करणे हे आद्य कर्तव्य आहे.
या श्रमदानात एकजूट लेणी समूहाचे प्रमुख आयोजक सारीश डोळस, प्रदीप अढांगळे, अक्षय भालेराव, समाधान सोनवणे, राजू भालेराव, लक्ष्मण सोनकांबळे , रवींद्र भालेराव, करण शिवशरण, सुरज सोनकांबळे, शैलेश पवार, शुभम डोळस, भूमिका डोळस, युवराज शिरसाट, रवींद्र सुर्वे, रवींद्र शेगावकर आदींनी सहभाग भाग घेतला.





