सातारा । मावळ्यांकडून सज्जनगड बुरुज तटबंदीची स्वच्छता दुर्गनाद प्रतिष्ठानचा उपक्रम

ठोसेघर – दिवाळी हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावेळी प्रत्येक जण आपल्या घराची स्वच्छता करतच असतो. मात्र, परळी खोऱ्यातील दुर्गनाद प्रतिष्ठानकडून ज्या राजामुळे आपण हे सण साजरे करू शकतो. त्या राजाचे गड किल्ले स्वच्छ करून दिवाळी साजरी करण्याचा निर्धार करत रविवार (दि. 20) रोजी किल्ले सज्जनगडावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी शेकडो दुर्गप्रेमींनी सहभाग नोंदवला होता.
गड किल्ले म्हटलं की बुरुज तटबंदी आलंच मग हे बुरुज तटबंदी त्याची निगा राखणे हे काम आपल्या मावळ्यांचेच आहे. नेमका हाच उद्देश ठेवून सज्जनगड संवर्धनासाठी दुर्गनाद प्रतिष्ठान सतत नवनवीन उपक्रम राबवत असते. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बुरुज तटबंदी तसेच इतरत्र मोठ्या प्रमाणावर झाडाझुडपांचे साम्राज्य पसरले होते. यामुळे काही अंशी बुरुज तटबंदीला मोठा धोका उद्भवत होता. यामुळे दुर्गनाद प्रतिष्ठानकडून या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्याचे आयोजन करण्यात आले.
या मोहिमेत गडावरील मुख्यद्वाराजवळील बुरुज तटबंदी यावरील झाडेझुडपे काढण्यात आली. बसस्थानक ते पायरी मार्गावरील कचरा गोळा करण्यात आला. गडावर आठ दिवसांपूर्वी बुरुजाचा काही भाग खचला होता याचा पूर्ण ढिगारा पायरी मार्गावर पडला होता. तो ढिगारा पायरी मार्गाहून काढतो मार्ग पुरवत करण्यात आला. यावेळी अंगाई देवी मंदिर परिसरातील स्वच्छता ही करण्यात आली.





