पुणे – केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण 2021′ स्पर्धा सुरु झाली आहे. महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थी, प्राध्यापकांनी यात सहभाग वाढवावा, अशा सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी दिल्या आहेत.
पुणे शहरात जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी महापालिकेने विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. प्रत्येक स्पर्धा प्रकारातील विजेत्यांना महापौर, आयुक्तांतर्फे विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेचे आयोजन 15 ते 25 ऑक्टोबरदरम्यान केले होते. त्यानंतर 26 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीसाठी मुदतवाढ दिली आहे.
सर्व स्पर्धांसाठी प्रवेश विनामुल्य आहे. हवेतील गुणवत्ता सुधार, स्वच्छ सर्वेक्षण, स्वच्छता विषयक जनजागृती, कचरा वर्गीकरण, प्लॅस्टिक बंदी, हगणदारीमुक्त शहर व पर्यावरण जनजागृती आदी विषय स्पर्धेसाठी आहेत. गुगल फॉर्म भरुन स्पर्धेत प्रवेश घेणे अनिवार्य आहे. शिवाय, त्यावरच स्पर्धा साहित्य, व्हिडीओ, पोस्टर्स, फोटो अपलोड करावयाचे आहेत.
भित्तीचित्रे स्पर्धेसाठी फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. अंतिम परीक्षणावेळी महापालिका सर्व स्पर्धकांसाठी ठिकाण निश्चित करून देईल व त्या ठिकाणी सर्व स्पर्धकांनी भित्तीचित्रे परीक्षणासाठी घेऊन जाणे आवश्यक आहे, असेही डॉ. देसाई यांनी स्पष्ट केले.