क्लासेनची क्लासिक फटकेबाजी ! हैदराबादचा दिल्लीवर 9 धावांनी विजय; मार्शची अष्टपैलू कामगिरी व्यर्थ

नवी दिल्ली – युवा सलामीवीर अभिषेक वर्माचे सुरवातीचे दमदार अर्धशतक व दक्षिण आफ्रिकन फलंदाज हेनरिक क्लासेनची अखेरच्या काही षटकांतील “क्लासिक’ फटकेबाजी यांच्या बळावर अरुण जेटली स्टेडियमवरील आयपीएलच्या 40 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्स संघाचा 9 धावांनी पराभव केला. दिल्लीकडून आधी गोलंदाजीत (4-27) व नंतर फलंदाजीत (63-39 चेंडू) मिशेल मार्शने केलेली अष्टपैलू कामगिरी हैदराबादच्या विजयामुळे व्यर्थ ठरली.
क्लासेनने अवघ्या 26 चेंडूंत 51 धावांची खेळी केली. त्याच्या या अंतिम वेळच्या फटकेबाजीमुळेच प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाने या सामन्यात 20 षटकांत 6 गडी गमावून 197 धावांचा पल्ला गाठला. हैदराबादसाठी युवा सलामीवीर अभिषेक शर्माची 67 धावांची उत्कृष्ट अर्धशतकी खेळी महत्त्वपूर्ण ठरली. अभिषेकनेही आधी फलंदाजी व नंतर गोलंदाजीत आपली चमक दाखवताना अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन केले.
हैदराबादच्या 198 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दिल्लीची सुरवात अतिशय खराब झाली. कारण कर्णधार डेव्हिड वॉर्नर शून्यावर बाद होऊन परतला. परंतू त्यानंतर मात्र फिल सॉल्ट व मार्श यांनी संघाचा डाव सावरत धावफलक फिरता ठेवला. सॉल्टने आपल्या खेळीत 59 धावा केल्या. अखेरीस दोघेही बाद झाल्यानंतर गोलंदाज अक्सर पटेलने 29 धावा करून झुंज देण्याचा प्रयत्न केला. परंतू, निर्धारित षटकांत दिल्लीचा संघ 6 बाद 188 धावाच फलकावर चढवू शकला. हैदराबादकडून मयंक मारकंडेने 2 तर अभिषेक शर्मा व टी नटराजन यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.
तत्पूर्वी, हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाच्या डावाची सुरुवात करण्यासाठी अभिषेक शर्मासह मयंक अग्रवाल मैदानात उतरला. परंतू, 5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या अग्रवालच्या रूपाने 21 धावांवर संघाची पहिली विकेट पडली. यानंतर आलेला राहुल त्रिपाठीही 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अभिषेक एकतर्फी खिंड लढवत असताना दुसऱ्या टोकाकडून विकेट पडण्याची प्रक्रिया चालू राहिली.
क्लासेनचे शानदार अर्धशतक
हेनरिक क्लासेनने 109 धावांवर 5 विकेट गमावलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाचा डाव सांभाळला. ज्यामध्ये त्याने अब्दुल सामदसोबत सहाव्या विकेटसाठी 33 चेंडूत 53 धावांची भागीदारी करून संघाची धावसंख्या 150 च्या पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर क्लासेनने अकीलसोबत 7 व्या विकेटसाठी 18 चेंडूत 35 धावांची उत्कृष्ट भागीदारी केली. दिल्लीकडून मिचेल मार्शने 4 तर इशांत आणि अक्सर पटेलने 1-1 विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक
सनरायझर्स हैदराबाद ः 20 षटकांत 6 बाद 197 (अभिषेक शर्मा 67-36 चेंडू, हेनरिक क्लासेन 51-26 चेंडू, अब्दुल सामद 28; मिशेल मार्श 4-27, अक्सर पटेल 1-29, ईशांत शर्मा 1-31) विजयी वि. दिल्ली कॅपिटल्स ः 20 षटकांत 6 बाद 188 ( फिल सॉल्ट 59-35 चेंडू, मिशेल मार्श 63- 39 चेंडू, अक्सर पटेल 29; मयंक मारकंडे 2-20, अभिषेक शर्मा 1-26, टी नटराजन 1-34).





