पुणे जिल्हा | भीमाशंकर कारखान्याच्या सभेत राष्ट्रवादीच्या दोन गटात धक्काबुक्की

पारगाव शिंगवे/मंचर, (प्रतिनिधी) – भिमाशंकर सहकारी साखर कारखान्यास ऊस देणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस पिकाचे उत्पादन घ्यावे व एकरी उत्पादन वाढवावे, असे आवाहन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. मात्र, या सभेत सुरुवातीला व शेवटी मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला. सभेतील १० विषय फक्त १० मिनिटात शांततेत आवाजी मतदानाने एकमुखी मंजूर करण्यात आले.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त येथे तैनात करण्यात आला होता. दिलीप वळसे पाटील व देवदत्त निकम अशा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत बसवताना पोलिसांना अक्षरशः कसरत करावी लागली.
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांच्या अध्यक्षतेखाली, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील व सर्व संचालकांच्या उपस्थितीत सभा सुरू झाली.
सभेच्या व्यासपीठा पुढे असलेल्या बॅरॅकेटमध्ये भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम व त्यांचे समर्थक येऊन बसले. त्यांनी बॅरॅकेटच्या बाहेर बसावे, अशी मागणी अन्य ऊस उत्पादक सभासदांनी व वळसे पाटील समर्थकांनी जोरदारपणे केली.
पण निकम व त्यांचे समर्थक जागेवरच बसून राहिल्यामुळे कार्यकर्त्यांनी जोरदारपणे घोषणा दिल्या. दिलीप वळसे पाटील सच्चा है ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणा देऊन सभागृह दणाणून सोडले.
यावेळी निकम समर्थकांनीही घोषणा देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची संख्या फारच कमी असल्याने त्यांचा आवाज फारसा घुमला नाही.
वाढलेला गोंधळ पाहून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निकम समर्थकांना बॅरॅकेटच्या बाहेर काढल्यानंतर गोंधळ थांबला. पण निकम मात्र बॅरिकेटमध्येच बसले होते. त्यानंतर सभागृहात शांतता पसरली. प्रास्ताविक बाळासाहेब बेंडे यांनी करून कारखान्याच्या प्रगतीचा अहवाल सादर केला.
भीमाशंकर कारखान्याचे यश हे केवळ संस्थापक अध्यक्ष सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यामुळेच आहे. तसेच यामध्ये ऊस उत्पादक सभासद, शेतकरी ,कारखान्याचे कर्मचारी व अधिकारी यांचे योगदान आहे.
पण काही चेअरमन माझ्यामुळेच कारखाना प्रगती पथावर आहे अशी टीमकी वाजवतात. या वाक्याला उपस्थित यांनी जोरदार टाळ्या व घोषणाबाजी करून दाद दिली.
भीमाशंकरचे काम पारदर्शक असून वेळोवेळी कारखान्याने सभासदांचे हित जपण्याचे काम केले आहे. यापुढेही सभासदांना सतत न्याय देण्याची भूमिका कारखाना घेईल.
ऊसाला दिलेल्या बाजार भाव बाबत शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याबरोबर चर्चा झाली असून त्यांनाही अहवाल पाठवलेला आहे. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्याबरोबरही याबाबत चर्चा झालेली आहे.
अनुसया उन्नती केंद्राच्या अध्यक्ष किरण वळसे पाटील, शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विष्णू हिंगे, कारखाण्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, गणपतराव इंदोरे, रवींद्र करंजखेले, विद्या बेंडे आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. भीमाशंकर कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी विषय पत्रिकेवरील दहाविषय सभासदांपुढे मांडले.
फक्त १० मिनिटातच आवाजजी मतदानाने सर्व ठराव टाळ्याच्या गजरात शांततेने मंजूर करण्यात आले. दरम्यान व्यासपीठाच्या खाली बसलेले देवदत्त निकम व्यासपीठाकडे जात असताना त्यांना सभासदांनी व कार्यकर्त्यांनी अडविले. तुम्ही संचालक आहात ही सभा सभासदांची आहे तुम्हाला जे बोलायचे ते संचालक मंडळाच्या बैठकीत बोला.
येथे बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही असे सांगून त्यांना व्यसपीठाकडे जाण्यापासून निलेश थोरात, मानसिंग पाचुंदकर, राजा बाबू थोरात यांच्यासह अनेक जणांनी रोखले.
त्यानंतर पुन्हा मोठा गोंधळ झाला. निकम समर्थकांकडून निकम यांना व्यासपीठावर जाऊ द्या, अशी मागणी केली जात होती. पण भीमाशंकरच्या अन्य सभासदांनी कार्यकर्त्यांनी निकम यांना कडाडून विरोध केला.
भीमाशंकर कारखान्यांच्या सभेत मला व सभासदांना व शेतकऱ्यांना बोलू द्यायचे नाही, असे पाच सहा दिवस अगोदर ठरले होते. म्हणून जाणूनबुजून गोंधळ घातला. घोषणाबाजी केली. गोंधळ घालणारे सर्वजण मलिदा गँग वाले होते.
मला स्टेजवर जावून दिले नाही. तसेच सभासदांना व शेतकऱ्यांना बालून दिले. दडपशाही मोठ्या प्रमाणात करण्यात आली.- देवदत्त निकम (संचालक व पुणे जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस -शरद पवार गट)
सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भिमाशंकर कारखान्याचे कामकाज सुरू असून कारखान्याने शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव दिला. चांगला चालत असलेल्या कारखान्यात विरोधक विनाकारण राजकारण आणत आहे. – बाळासाहेब बेंडे (अध्यक्ष- भीमाशंकर साखर कारखाना )
शेतकऱ्यांचे हित असलेल्या सहकारी साखर कारखान्यात राजकारण आणून गोंधळ घालणे चुकीचे ठरेल.कोणत्याही सहकारी संस्थेत गोंधळ चुकीचे आहे हे कुठे तरी थांबायला हवे. – शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार





