Moshi Accident : खुलासे आले पण झाकून ठेवले; कुलकर्णी यांचा मुदत संपल्यावर खुलासा
Moshi Accident : आयुक्त सूर्यवंशी यांनी हे खुलासे माध्यमांमध्ये न देता झाकून ठेवले

पिंपरी – मोशी दुर्घटनेनंतर वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबवत असलेली कंपनी आणि पर्यावरण विभागातील मुख्य अभियंता व कार्यकारी अभियंता यांना नोटीस देत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी खुलासे मागवले होते. त्यासाठी मंगळवारी (दि. १४) सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. असे असताना कंपनी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांनी वेळेत खुलासा सादर केला. तर मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी एक तास उशिरा खुलासा सादर केला. मात्र, हे खुलासे अद्याप प्रसिद्ध करण्यात आले नाही.
मोशी कचरा डेपो येथील दुर्घटनेबाबत आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांच्याकडे ठेकेदार कंपनी अँटोनी लारा रिन्युव्हेबल यांना नोटीस देत खुलासा मागितला होता. त्याच पद्धतीने मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांच्याबाबत अनेक गंभीर मुद्दे उपस्थित करत खुलासा करण्यास सांगितले होते. त्यासाठी दिलेल्या मुदतीत कंपनी व कार्यकारी अभियंता आल्हाट यांनी खुलासा सादर केला.
तर मुख्य अभियंता कुलकर्णी यांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खुलासा सादर न करता मुदत संपल्यानंतर तब्बल एक तासाने खुलासा सादर केला. मुदत संपली असतानाही आयुक्तांनी त्यांचा खुलासा स्वीकारला. खुलासे सादर झाल्यानंतर ते काय आहेत? तसेच यापुढे काय कार्यवाही करणार हे जाहीर करणे अपेक्षित होते.
मोशी दुर्घटना गंभीर असून तसेच अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील फसवणूक केलेली असल्याने या खुलास्यांकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, आयुक्त सूर्यवंशी यांनी हे खुलासे माध्यमांमध्ये न देता झाकून ठेवले. त्यामुळे आता कारवाई होणार की फक्त अधिकाऱ्यांना नोटीसा देत पाठिशी घालणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Mumbai News : मुंबईत ३ बनावट कॉल सेंटर्सचा पर्दाफाश! विमा पॉलिसीधारकांना लुटणाऱ्या १२ जणांना अटक





