नगर – ओढे नाल्याची साफसफाईसाठी ठेकेदार, कचरा संकलन ठेकेदार, पथदिवे बसविणे व देखभाल दुरुस्तीसाठी ठेकेदार, पाणीपुरवठा वितरण व देखभाल दुरुस्तीसह आवश्यक त्या विभागांना लागणारे कर्मचारी पुरविण्यासाठी देखील आता ठेकेदार असल्याचे मंगळवारी झालेल्या महापालिकेच्या सभेत समोर आल्याने सत्ताधाऱ्यासह विरोधी नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. महापालिका आता ठेकेदारांना चालविण्यासाठी दिली का? अधिकाऱ्यांची ठेकेदारांशी बांधिलकी आहे का? महापालिका ठेकेदारांच्या दावणीला बांधली का? असे सवाल करून प्रशासनासह महापौरांच्या कारभाराचे चक्क वाभाडेच काढण्यात आले. महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज महासभा झाली. यावेळी महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या सेवा व सुविधा या ठेकेदारांमार्फतच दिल्या जात असून त्यात नागरिकांना मिळत नसल्याने नरगसेवकांनी थेट प्रशासनावरच हल्लाबोल केला. पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढे नाले, नदीची साफसफाई करण्यासाठी ठेकेदार नियुक्त केला आहे. त्यामुळे महापालिकेने 27 कोटी रुपये खर्च करून आणलेले जेसीबी व पोकलेन गेल्या आठ महिन्यांपासून धुळखात पडून आहे. महापालिकेकडे वाहने असतांनाही ठेकेदार का नियुक्त केला अशी विचारणा शाम नळकांडे यांनी केली. त्यावेळी उपायुक्त यशवंत डांगे यांनी जेसीबी व पोकलेनसाठी वाहनचालक मिळत नसल्याने ती वाहने बंद आहे. वाहनचालकासाठी प्रयत्न करण्यात आले परंतू न मिळाल्याने ठेकेदाराकडून ते मिळविण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यावरू नळकांडे म्हणाले की, आता महापालिका देखील ठेकेदारांकडेच चालविण्यासाठी देणार का असा सवाल केला. याविषयावरून कुमार वाकळे, महेंद्र गंधे, संपत बारस्कर या नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर अखेर पुढील सोमवारपासून वाहनचालक नियुक्त करून जेसीबी व पोकलेन चालू करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. शहरातील बंद पडलेल्या पथदिव्यांचा प्रश्न मालण ढोणे यांनी उपस्थित केला. त्यावरून विद्युत विभागाच्या अभियंत्याकडून उडवा उडवीची उत्तरे देण्यात आल्याने नगरसेविका मनिष बारस्कर यांनी प्रशासनाचे वाभाडेच काढले. अधिकाऱ्यांची ठेकेदारांबरोबर बांधिलकी दिसत आहे. कोणतेही काम सांगितले की ठेकेदाराला सांगतो. मग महापालिकेत काम करीत कोण करते. शहरात पथदिवे बसविण्यासह त्यांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी ठेकेदार आहे. त्यावर उपायुक्त डांगे म्हणाले की, पथदिवे बसविणाऱ्या ठेकेदाराला अद्यापही काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिले नाही. कारण या कामाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणी बाकी आहे. ही तपासणी करण्यास कोणी तयार नाही. तंत्रनिकेतन नगर, औरंगाबाद याबरोबर चर्चा केली पण त्यांनी नकार दिला आहे. आता खासगी यंत्रणेमार्फत तपासणी केल्यानंतर पथदिव्यांचा प्रश्न मार्गी लागेल. बोगस तपासणी प्रमाणपत्राचा मुद्दा आटोपता बांधकाम विभागात शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाकडून आलेले तपासणी प्रमाणपत्र बोगस असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. बांधकाम विभागाने 725 विविध कामांच्या साहित्याचा दर्जा तपासणीसाठी तंत्रनिकेतनकडे तपासणी प्रमाणपत्र मागितले होते. त्यापैकी केवळ 350 कामांचे प्रमाणपत्र तंत्रनिकेतन दिले असून उर्वरित 449 प्रमाणपत्र खोटे असल्याचा मुद्द महेंद्र गंधे यांनी उपस्थित केला. यावरून त्यांनी बांधकाम विभागाचे अभियंता पाखरे यांना प्रश्नांचा भडीमार केला असतांना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी तो मुद्द अन्य वळविण्याचा प्रयत्न करून तंत्रनिकेतन महाविद्यालयतील कर्मचारी याला दोषी असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यात आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी या प्रकरणाची चौकशी अतिरिक्त आयुक्तांना करण्याचे आदेश दिले आहे. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यात जे दोषी आढळतील. त्यावर कारवाई केली जाईल असे सांगून हा विषय आटोपता घेतला. कोतकर व शिंदे यांच्यामध्ये हमरी-तुमरी भाजपचे मनोज कोतकर व ठाकरे गटाचे सचिन शिंदे या दोघांत हमरीतुमरी झाली. दोघांनी परस्परांना उद्देशून आरे-कारे केले. दोघांमध्ये कल्याण रस्त्यावरील ड्रीम सिटी प्रकल्पाच्या पाणीपुरवठ्यावरून वैमनस्य निर्माण झाले होते. त्याचे पडसाद उमटले. इतर नगरसेवकांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केले. मुख्य जलवाहिनीवरील टॅबचा विषय स्थगित शहर पाणीपुरवठ्याच्या अमृत योजनेच्या मुख्य जलवाहिनीवरून तपोवन रस्ता भागासाठी टॅब देण्याची मागणी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी केली होती, मात्र असे ‘टॅब’ मुख्य जलवाहिनीवरून दिले गेल्यास योजनेत तांत्रिक दोष निर्माण होतील असे पत्र जीवन प्राधिकरणाने दिले होते. अमृतच्या मुख्य जलवाहिनीवरून कोणतेही कनेक्शन न देण्याचा विषय महासभेपुढे मंजुरीसाठी होता. टॅब देण्यास भाजप व कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता. त्यामुळे सभेत कोणता निर्णय घेतला जातो, याबद्दल उत्सुकता होती. परंतु महापौर शेंडगे यांनी या विषयाला स्थगिती देत हा निर्णय नगरसेवक व प्रशासनाच्या एकत्रित बैठकीत घेतला जाईल, असे स्पष्ट केले. सभेला गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाई महासभेला आत बहुतांशी अधिकाऱ्यांनी दांडी मारली. रजेवर असल्याने हे अधिकारी सभेला उपस्थित राहु शकले नाही असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यावर नगरसेवकांनी आक्षेप घेऊन सभेचा अजेंठा निघाल्यानंतर जे अधिकारी रजेवर गेले असतील. अशा सर्वांना कारवाई करण्याची मागणी केली.त्यावर महापौरांनी कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.