सीकेपी सहकारी बॅंकेचा परवाना रद्द

ऐन लॉकडाऊनमध्ये लाखो खातेधारकांवर आर्थिक संकटाची कुऱ्हाड
मुंबई : राज्यातील 104 वर्षे जुनी असलेल्या सीकेपी सहकारी बॅंकेचा परवाना भारतीय रिझर्व्ह बॅंकेने रद्द केला आहे. सीकेपी बॅंकेच्या मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात अनेक शाखा आहेत. ही बॅंक 1915 मध्ये सुरु झाली होती. परवाना रद्द झाल्याने या बॅंकेच्या खातेधारकांची 485 कोटी रुपयांची एफडी गुंतवणूक अडकली आहे. याआधी पीएमसी बॅंकेवरील निर्बंधांनीही खातेधारकांच्या अडचणीतही अशीच वाढ झाली होती. ऐन लॉकडाऊनच्या काळात झालेल्या या कारवाईने बॅंकेतील खातेधारकांची मोठी आर्थिक कोंडी होणार आहे.
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, सीकेपी बॅंकेचा वाढता तोटा आणि नेट वर्थमधील तूट यामुळे बॅंकेवर 2010 पासून काही निर्बंध लादण्यात आले होते. हे निर्बंध वारंवार वाढण्यात आले होते. यावेळी 31 मार्चला संपणाऱ्या निर्बंधांमध्ये 2 महिन्याची वाढ करुन ते 31 मेपर्यंत वाढवण्यात आले होते. मात्र, बॅंकेची डासाळती स्थिती पाहता आरबीआयने या निर्बंधाचा कालवधी संपण्याआधीच परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला. बॅंकेकडून अनेकदा तोटा कमी करण्यासाठी प्रयत्न केले गेले.
यासाठी खातेदार आणि गुंतवणुकदार यांनीही प्रयत्न केले. बॅंकेने व्याजदरात कपात करत ते 2 टक्क्यावर आणले होते. बॅंकेतील काही गुंतवणुकदारांनी आपली एफडी शेअर बाजारात गुंतवली होती. त्यानंतर त्याचा काही प्रमाणात परिणामही दिसून बॅंकेचा तोटाही कमी होत असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत आरबीआयने नेटवर्थमधील घट पाहता परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे गुंतवणुकदारांना मोठो धक्का बसला आहे. 2016 मध्ये बॅंकेचा नेटवर्थ 230 कोटी होता. आता हा नेटवर्थ 146 कोटी रुपयांवर पोहचला आहे.





