खासदार नितीन पाटील यांचा कोरेगावात आज नागरी सत्कार

कोरेगाव – जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन लक्ष्मणराव पाटील यांची राज्यसभा सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल कोरेगाव तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्यावतीने त्यांचा नागरी सत्कार उद्या, दि. 15 रोजी दुपारी 1 वाजता कोरेगाव येथे करण्यात येणार आहे. त्यासाठी कोरेगाव तालुका सत्कार समितीची स्थापना करण्यात आली आहे.
खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्यासमवेत काम केलेले ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते खासदार नितीन पाटील यांचा सत्कार रविवारी करण्यात येणार आहे. मार्केट यार्ड आवारातील गीताई मंगल कार्यालयात होणार्या या कार्यक्रमास कराड उत्तर, फलटण-कोरेगाव आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील नितीनकाका पाटीलप्रेमी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
सातारा जिल्ह्याचे विकासपुरुष खासदार लक्ष्मणराव पाटील यांनी कोरेगाव तालुक्यावर विशेष प्रेम केले. या तालुक्यात असंख्य कार्यकर्ते घडवले आणि त्यांना प्रेम देत मोठे केले. आजही कोरेगाव तालुक्यात खासदार गट म्हणून या कार्यकर्त्यांची ओळख आहे.
या गटाची मोठी ताकद विधानसभा मतदारसंघात असून, या गटाच्या मतांच्या बेरजेवरच तालुक्याचे राजकारण ठरत आले आहे. केवळ कोरेगाव तालुक्यातच नव्हे, तर जिल्हास्तरावर स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांमध्ये विविध पदांवर काम करत असलेल्या आणि यापूर्वी काम केलेल्या असंख्य पदाधिकार्यांना खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्यासह खासदार नितीन पाटील यांनी संधी दिली आहे. खा. नितीन पाटील यांचाही कोरेगाव तालुक्याशी विशेष स्नेह असून, ते गेली 25 वर्षे तालुक्यातील सामान्य कार्यकर्त्यांशी समरूप झाले आहेत.
जिल्हा मध्यवर्ती बँक आणि किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना यांच्या माध्यमातून ते सर्वसामान्य शेतकर्यांशीसुद्धा जोडले गेले आहेत. त्यांच्या माध्यमातून कोरेगाव तालुक्यात असंख्य विकासकामे झाली आहेत. राज्यसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा कोरेगाव तालुक्याच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन कोरेगाव तालुका सत्कार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.





